बाबा बोलावतात तेव्हाच…” आमची केदारनाथ यात्रा - भाग ६ (सोनप्रयाग ते गौरीकुंड)
(सोनप्रयाग ते गौरीकुंड)
पहाटे तीन ला निघून आम्ही गाडीने सीतापूरला पोहोचलो आणि
अपेक्षेप्रमाणे संपूर्ण रस्ता वाहनांनी अक्षरशः गच्च भरलेला होता. गाड्यांच्या
लांबच लांब रांगा,
हॉर्नचा
आवाज, यात्रेकरूंची गर्दी आणि सतत वाढत
जाणारी अस्वस्थता… वातावरण पूर्णपणे यात्रेच्या ताणाने भरून गेलं होतं. फक्त
आम्हीच नाही, तर बहुतेक यात्रेकरू चारच्या सुमारास
तिथेच अडकले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण त्याचवेळी केदारनाथ दर्शनाची ओढही
स्पष्ट दिसत होती. आमचा मूळ प्लॅन रात्री विश्रांती घेऊन पहाटे लवकर
सोनप्रयागमार्गे गौरीकुंड गाठण्याचा होता. पण परिस्थिती वेगळीच वळण घेत होती.
ट्रॅफिक इतका प्रचंड होता की जवळजवळ तासभर एकही वाहन हललं नाही. रस्ता पूर्णपणे
ठप्प झाला होता. काही लोक गाड्यांमधून उतरून परिस्थिती पाहत होते, काहीजण पुढे किती अंतर आहे हे विचारत
होते, तर काहींनी आधीच चालत जाण्याचा निर्णय
घेतला होता.
शेवटी आमच्या टीममधल्या अर्ध्या जणांनी म्हणजेच
उत्साही गणपती गटाने ठरवलं — “आता थांबण्यात अर्थ नाही… अजून एक किलोमीटर चालत
सोनप्रयाग गाठलेलं बरं.” कारण तिथून पुढे गौरीकुंडकडे जाणाऱ्या शेअर जीप्स मिळतात.
प्रवासात कधी कधी वाहनांपेक्षा स्वतःच्या पायांवर जास्त विश्वास ठेवावा लागतो, हे त्या क्षणी जाणवलं. आम्ही अजून थोडा वेळ थांबलो. गाडी थोडी
पुढे सरकली, पुन्हा थांबली. पुन्हा काही मिनिटं
गेली. शेवटी आम्हीही म्हणजे कार्तिक गटाने निर्णय घेतला. बॅगा खांद्यावर घेतल्या आणि
सोनप्रयागच्या दिशेने चालायला सुरुवात केली.
सोनप्रयागचा पूल ओलांडला आणि पुढे गौरीकुंडकडे जाणाऱ्या जीप स्टँडवर
पोहोचलो. इथून पुढे साधारण चार ते पाच किलोमीटरचा प्रवास शेअर जीपने करावा लागतो. प्रति
माणसी पन्नास रुपये निश्चित केले आहेत. पण खरी परीक्षा बहुतेक इथूनच सुरू होत होती.
पहिल्या घासाला मिठाचा खडा लागावा असाच काहीसा अनुभव आला. पाहतो तर काय, समोर शेकडो
यात्रेकरूंची गर्दी आणि त्या तुलनेत अत्यंत कमी वाहने होती. येणारे भाविक आणि
उपलब्ध वाहनं याचा काहीच ताळमेळ दिसत नव्हता. व्यवस्थापन नावाची गोष्ट अजिबात
जाणवत नव्हती. जीप आली की क्षणार्धात लोक तिच्याकडे धावत सुटायचे. कुठली रांग नाही, कुठला क्रम नाही… फक्त जागा
मिळवण्यासाठी चाललेली झुंबड.
काही लोक अक्षरशः धावत जाऊन जीपला लटकत होते. कुणी उडी मारून, आत रेटून जागा पकडत होतं, कुणी दुसऱ्याला ढकलून पुढे सरकत होतं. रेटारेटी, ओरड, भांडणं, “मी आधी”, “तू हट, हमने पकडी है जीप... हो” अशी सततची तू-तू मै-मै सुरू होती. काहींच्या तोंडून शिवराळ भाषा देखील सहज बाहेर पडत होती. श्रद्धेच्या यात्रेत माणसाचा संयम किती पटकन तुटतो, हे त्या गर्दीत स्पष्ट दिसत होतं. तरुण मंडळी तरी त्या गर्दीत स्वतःला सांभाळू शकत होती. कुणी धावत जागा पकडत होतं, कुणी मित्रांसाठी सीट राखत होतं. पण महिला, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांची अवस्था मात्र वेगळीच होती. ते फक्त बाजूला उभं राहून हा सगळा गोंधळ असहायपणे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा, असुरक्षितता आणि वाट पाहण्याची मजबुरी स्पष्ट दिसत होती.
त्या प्रचंड गर्दीत आणि गोंधळात आमचा ग्रुपही हळूहळू विखुरायला लागला. “ज्याला जशी जागा मिळेल तसं पुढे निघायचं” अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. कुणाला एखाद्या जीपच्या मागच्या सीटवर जागा मिळाली, कुणी दरवाज्याला लटकून कसतरी आत शिरलं, तर कुणी अजूनही गर्दीत उभं राहून पुढच्या जीपची वाट पाहत होतं. एकत्र सुरू झालेला प्रवास त्या क्षणी प्रत्येकासाठी वैयक्तिक संघर्ष बनला होता. खरं सांगायचं तर, तिथे फक्त एक-दोन पोलीस कर्मचारी किंवा व्यवस्थित रांग लावणारी व्यवस्था असती, तरी बराच फरक पडला असता. लोकांना शिस्त लावणारा किंवा महिलांना आणि ज्येष्ठांना प्राधान्य देणारा कुणीतरी असणं खूप गरजेचं वाटत होतं. पण व्यवस्थापन कुठंही दिसत नव्हतं.
आणि त्याहून कठीण गोष्ट म्हणजे लोकांचं वर्तन. श्रद्धेच्या यात्रेला आलेलो असलो, तरी अनेक ठिकाणी माणुसकीपेक्षा स्वार्थ जास्त दिसत होता. स्वतःची जागा मिळवण्यासाठी दुसऱ्याला ढकलणं, मध्ये घुसणं, मोठ्याने भांडणं, उद्धटपणे बोलणं… जणू प्रत्येकाला फक्त स्वतःचाच विचार होता. “मी आधी” या मानसिकतेपुढे शिस्त, संयम आणि सहप्रवाशांचा विचार कुठेतरी हरवत चालला होता. त्या गर्दीत उभं राहून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती — भारतात मोठ्या प्रमाणावर crowd management ही फक्त प्रशासनाची जबाबदारी नाही, तर नागरिकांची शिस्तही तितकीच महत्त्वाची आहे. कारण नियम नसले तरी माणुसकी आणि संयम असू शकतो… पण दुर्दैवाने त्या क्षणी दोन्हींची कमतरता जाणवत होती.
आम्ही मात्र एकमेकांशी संपर्क ठेवत, कुणी पुढे पोहोचलं का याची खात्री करत पुढे सरकत होतो. केदारनाथचा
प्रवास अजून सुरूही झाला नव्हता… पण यात्रेने आम्हाला पहिल्याच दिवशी संयम, गोंधळ आणि वास्तवाचं पहिलं दर्शन घडवलं
होतं. आमचाही जवळजवळ दीड तास तसाच गेला. प्रत्येक वेळी वाटायचं — “ही जीप मिळेल
कदाचित…” पण गर्दीचा एक लोट यायचा आणि पुन्हा सगळं तसंच. थंडी, थकवा, गर्दी आणि सततचा गोंधळ… शरीरापेक्षा मन जास्त दमायला लागलं होतं.
शेवटी पुढे जाऊन एक जीपवाला पकडला आणी गौरीकुंड कडे निघालो. पहाटे तीनला निघून सात
आठच्या सुमारास गौरीकुंडला आलो. दोन्ही गटांना पोटभर नाश्ता करून घ्यायला सांगितले
आणि गटनिहाय चढाईला सुरुवात झाली. एव्हाना गौरीकुंड सोडले तेंव्हा साडे नऊ झाले होते.
वेळापत्रक साफ कोलमडले होते. सगळ्यांना हा अनपेक्षित सकाळचा ट्राफिक आणि जीपवारीचा
संघर्ष जड गेला होता. असो, आता एक ठाम नक्की होतं की केदारनाथची यात्रा ही फक्त
डोंगर चढण्याची नाही, तर
संयमाची देखील परीक्षा आहे. आणि ती परीक्षा पहिल्याच टप्प्यात सुरू झाली होती…चला तर
मग..सगळेच हर हर महादेव म्हणत बाबा केदारनाथ कडे एका विशेष ओढीने चालू लागले.
क्रमश:
प्रा.
डॉ. सचिन शंकर गाडेकर
(गडकरी
समूह)






Comments
Post a Comment