बाबा बोलावतात तेव्हाच…” आमची केदारनाथ यात्रा - भाग ०९ कळस दर्शन आणि संकल्पपूर्ती

 

बाबा बोलावतात तेव्हाच…” आमची केदारनाथ यात्रा - भाग ०९

कळस दर्शन आणि संकल्पपूर्ती


केदारनाथ प्रवासातील अत्यंत रोमांचक वळणावर आलो होतो. किमान सात चालल्यावर आता कुठे घोड्यांचा stand दिसू लागला आणि एक वेगळाच उत्साह अंगात संचारला. दिवसभर घोडे आणि खच्च्रर ने वैतागलेले आम्ही तिकडे जरा दुर्लक्ष करतच पुढे निघालो. आसपास तिथं शेकडो घोडे उभे होते. काही जण सांगत होते की इथे तब्बल ७००० पेक्षा जास्त घोडे आहेत. नेमका आकडा माहीत नाही
, पण ते दृश्यच सांगत होतं. हा पॉइंट म्हणजे मनाला थोडासा दिलासा देणारा… कारण सगळ्यात कठीण ट्रेक मागे पडल्यासारखं वाटत होतं. पण वास्तव अजून वेगळंच होतं कारण अजून बरंच चालायचं बाकी होतं. आम्ही ठरवलं… आता थांबायचं नाही.

आमच्या प्रमाणेच आमच्या ग्रुपमधले बरेच जण थकले होते, गती मंदावली होती. कितीही पुढं निघालो तरी आतून बाहेरून आमचीही अवस्था काही वेगळी नव्हती. एकदा बाजूच्या कठड्यावर डोकं टेकवून २० मिनिटे झोप काढली. एरवी बारीक आवाजांनी झोप मोडणाररे आम्ही तिथं त्या गलक्यात ठार झोपलो होतो. डोकं टेकवले आणि झोप लागली जाग आली आणि परत एकमेकांची विचारपूस करत, पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मनात आता फक्त एकच ओढ होती — कधी एकदा मंदिराचा कळस दिसतो. कधी एकदा महादेवांच्या धामाचं पहिलं दर्शन होतं. दोन-तीन छोटे ब्रेक घेत घेत आम्ही बेस कॅम्पपर्यंत पोहोचलो. आणि तिथे जे दृश्य माझ्या डोळ्यांसमोर आलं…ते शब्दांत मांडणं खरंच अशक्य आहे. समोर उभा होता हिमालयाच्या कुशीत विसावलेला दिव्य बाबा केदारनाथ मंदिर परिसर. आणि त्या क्षणी सगळा थकवा… सगळी वेदना… सगळा प्रवास… एका क्षणात सार्थकी लागला.पहिलं दर्शन… आणि मन फक्त एवढंच म्हणालं — आलो महादेव… शेवटी तुमच्यापर्यंत आलो…”

शरीर आता पूर्णपणे थकलं होतं… पाय अक्षरशः साथ सोडण्याच्या अवस्थेत होते. सलग चढाई, कमी ऑक्सिजन, आणि २४ किलोमीटर पेक्षा अधिक प्रवास शरीराची प्रत्येक मर्यादा तपासत होता. एक क्षण असा वाटत होता की आता बस्स… आणखी चालणं कठीण आहे. पण… जसा मंदिराच्या कळसाचा पहिला दर्शनाचा क्षण आला, तसं सगळंच बदललं. क्षणभरात शरीराचा थकवा कुठच्या कुठे गायब झाला. मनात एकच भावना उसळली — स्वप्न आता फक्त काही पावलांवर आहे… ज्यासाठी इतका प्रवास केला, इतकी मेहनत घेतली… ते आता समोर उभं आहे. मनात एकच गाणं येत होतं ..अब है सामने, तुझे छू लू जरा..डोळे भरून आले होते. महादेव तुम्हीच प्रेरणा दिली आणि इथपर्यंत घेऊन आलात.

दिवसभर चालताना जोरात धडधडणारं हृदय, जे काही वेळापूर्वी अवघड चढाईमुळे त्रास देत होतं… तेच आता आनंदाने नाचत होतं. समोर दिसणारं केदारनाथ मंदिर परिसर… तो क्षण… त्या भावना… शब्दांच्या पूर्णपणे पलीकडचं होतं. असं वाटलं जणू शरीर विसरून गेलं आहे की इतका वेळ आपण स्वतःला किती ढकलत होतो. आता फक्त एकच क्षण होता  महादेवांच्या चरणांपर्यंत पोहोचल्याचा. ज्यांनी केदारनाथची वाट पायी चालत पूर्ण केली आहे किंवा तिथपर्यंत गेले तेच या भावनेशी खर्‍या अर्थाने जोडले जाऊ शकतात. कारण हा प्रवास फक्त ट्रेक नाही तर एक स्वप्न आहे. असो. लगेच पुढे निघालो. मंदिर परिसर बऱ्यापैकी गजबजलेला होता. गर्दी होतीच. डोक्यावरून दर तीन चार मिनिटाला एक हेलिकॉप्टर जात होतं. आज वातावरण चांगलं असल्याचा फायदा होत असावा. भाविक आणि कंपनी दोघांनाही. फक्त तो आवाज सगळी शांतता भंग करत होता. अश्या ठिकाणी दर पाच मिनिटांत जर कर्णकर्कश आवाज येतच राहिला तर काय बोलावं? उत्सुकतेने काही हेलिकॉप्टर उतरताना आणि परत झेपावताना पाहिले आणि पुढे निघालो. 

एक लोखंडी पूल आला की दर्शन रांग सुरु होते. सोबतचे नोदणी पत्र किंवा QR दाखवून मंदिर दर्शनाची रांग सुरु होते. त्या दिवशी पुलापासुनच रांग दिसत होती. आम्ही पहाटे दर्शन घेणार असे ठरल्याने आधी रूमवर जाऊन, फ्रेश होऊन, संध्याकाळची आरतीसाठी तयार व्हायचं होतं. किमान साडे पाच वाजले असतील आणि मंदिरासमोर उभा होतो. मंदिर परिसरातच निवास व्यवस्था केली होती. पटकन जवळ असलेली खोली शोधली. खांद्यावरचं ओझं खाली टाकलं. नळातून येणारं पाणी चक्क इतकं गार होतं की काय सांगावं...पटकन jacket चढवलं, अंगात थर्मल घातलं कारण एव्हाना गारवा जाणवू लागला होता. एकदम थंडीची लाट यावी असं वातावरण झालं होतं. मंदिरासमोरील दुकानात एक कडक चहा घेतला आणि हातात कॅमेरा घेऊन केदारनाथचं वैभव टिपायला सुरु केलं.

 

क्रमश:

प्रा. डॉ. सचिन शंकर गाडेकर

(गडकरी समूह)

Comments