बाबा बोलावतात तेव्हाच…” आमची केदारनाथ यात्रा - भाग १० भीमशिळा दर्शन आणि तिथला संवाद
बाबा बोलावतात तेव्हाच…” आमची केदारनाथ यात्रा - भाग १०
भीमशिळा दर्शन आणि तिथला संवाद
विज्ञान आणि अध्यात्म या कोंडीत अडकण्यापेक्षा विचार अजून पुढे गेला. त्या शिळेवर डोकं टेकवलं. तिथं जागा शोधून बसलो. आसपास अनेक भाविक होतेच पण बसलो आणि मनात विचारचक्र सुरु झालं. सह्याद्रीत फिरून फिरून विचार ही त्याच ध्यासात असतात. मन गर्क झालं हे असं.... निसर्गाच्या भाषेत पाहिलं तर ती फक्त एक मोठी शिळा — एक साधा खडक. पण श्रद्धा, इतिहास आणि भावनांच्या नजरेतून पाहिलं, तर ती मला बाजीप्रभू देशपांडे यांच्या पावनखिंडीतल्या त्या अद्भुत पराक्रमाची जिवंत प्रतिमा वाटली. जसं पावनखिंड लढाई मध्ये स्वराज्याचं वैभव संकटात असताना बाजीप्रभूंनी हातात दांडपट्टा घेऊन गनिमाला खिंडीत रोखून धरलं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना सुरक्षितपणे पुढे जाण्यास भाग पडले. ‘लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे.’ कोणाला कुठं आणि कसं समर्पण करावं लागेल ते माहित नाही. पण अवघा भविष्यकाळ त्याची नोंद घेईल असे बाजी, तान्हाजी विरळच. त्याग, समर्पण आणि विश्वास म्हणजे सह्यादीचे मावळे. केदारनाथाच्या पायरीवर बसून मनोमन नमन करत होतो या वीरांना.
तसंच आयुष्यातही काही नाती, काही माणसं, काही मूल्यं अशी असतात जी स्वतः तुटण्याची तयारी ठेवतात पण आपल्याला तुटू देत नाहीत. कधी ते आई-वडील असतात, कधी मित्र, कधी गुरू, कधी आपल्या विचारांची ताकद; पण प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक भीमशिळा असणं म्हणजेच संकटातही सुरक्षिततेची जाणीव असणं. कारण जगण्यात खरी ताकद केवळ स्वतः लढण्यात नसते, तर कुणीतरी न बोलता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे या विश्वासात असते. भीमशिळा म्हणजे फक्त एक खडक नाही; ती आपल्याला शिकवते खरं प्रेम, खरं नातं आणि खरं सामर्थ्य तेच, जे वेळ आली तर स्वतःवर संकट झेलूनही आपल्या माणसांना सुरक्षित ठेवतं. बरोबर ना?
शिळेमागच्या महादेवाकडे पाहिलं आणि जणू बोलू लागलो की हे महादेवा, मला एखादा असा भीमशिळेसारखा दगड जरी केलंत ना मला महादेवा तरी चालेल. कोणाच्या ना कोणाच्या असं कामी यावं असं नशीब असावं. आपण उभं ठाकलो एकदाचं की प्रलय सुद्धा काही करू शकणार नाही हे सांगत होती भीमशिळा मला. किती भाग्यवान असेल ते अस्तित्व, ज्याच्या वाट्याला स्वतः झिजून दुसऱ्याला वाचवण्याचं भाग्य येतं. स्वतःवर संकट झेलायचं, पण दुसऱ्याला सुरक्षित ठेवायचं. स्वतः शांत राहायचं, पण समोरच्याच्या आयुष्यातील प्रलय रोखायचा. त्या क्षणी जाणवलं, जगण्यात मोठेपण उंच शिखरावर पोहोचण्यात नसतं; तर कोणाच्या जीवनात संकट समोर उभं असताना आपण अशी एक भक्कम भिंत बनण्यात असतं की आपल्या अस्तित्वामुळे समोरच्याचं आयुष्य वाचेल.
जणू ती शिळा सांगत होती ईश्वर प्रत्येकाला घडवतात, पण ते प्रत्येकाला सारखं काम देत नाहीत. काहींना फुलासारखं उमलायचं असतं, काहींना दीपासारखं जळायचं असतं आणि काहींना माझ्यासारखं उभं राहायचं असतं संकटांच्या समोर, प्रलयाच्या समोर, काळाच्या समोर. किंबहुना थेट डोळ्यात डोळे घालून विचारतच होती की आहेस ना एवढा तयार? राहशील ना खंबीर उभा? संकट टाळशील ना माझ्यासारखं अडीग उभं राहून? जमेल ना तुला? फार मोठ्ठं नसेलही पण छोट्या मोठ्या संकटात तग धरशील ना? तग धरतोयसं ना? आहेस ना तयार? राहशील ना तयार?
मग नकळत मनातून महादेवांना एकच विनंती बाहेर पडली हे महादेवा, माझी योग्यता तुम्हाला ठाऊक आहे. माझ्यात काय सामर्थ्य आहे हेही तुम्ही जाणता. पण एक विश्वास तुम्हाला देतो माझा वापर करायचा असेल, तर करा. कोणाच्या आयुष्यात ढाल बनायचं असेल, तर मला पुढे करा. कोणाच्या संकटासमोर उभं ठाकायचं असेल, तर मला तिथे उभं करा. मी तयार आहे… या भीमशिळेसारखा खंबीर, अडीग, संरक्षक, विश्वासू, भव्य, दिव्य आणि पवित्र. हे देवा, आयुष्य किती मोठं मिळेल माहित नाही; पण इतकं नशीब नक्की दे की कोणाच्या तरी आयुष्यात मी अशी एक भीमशिळा बनून उभा राहीन, ज्याच्यामुळे त्यांच्यावर येणारं संकट माझ्यावर थांबेल. मग आयुष्य सार्थकी लागलं असं समजेन. हर हर महादेव.
क्रमश:
प्रा. डॉ. सचिन शंकर गाडेकर
(गडकरी समूह)




Comments
Post a Comment