बाबा बोलावतात तेव्हाच…” आमची केदारनाथ यात्रा - भाग ५ (रुद्रप्रयाग संगम, माता धारी देवी, अगस्त्य मुनी दर्शन)
बाबा बोलावतात तेव्हाच…” आमची केदारनाथ यात्रा - भाग ५
(रुद्रप्रयाग संगम, माता धारी देवी, अगस्त्य मुनी दर्शन)
श्रीनगरजवळ पोहोचल्यावर आम्ही माता धारी देवी मंदिरात दर्शनासाठी
थांबायचं ठरवलं. उत्तराखंडमध्ये अलकनंदा नदीच्या मध्यभागी असलेल्या एका उंच खडकावर
वसलेलं हे मंदिर श्रद्धा आणि रहस्य यांचं अद्भुत मिश्रण वाटतं. स्थानिक लोक धारी
देवींना संपूर्ण गढवाल प्रदेशाची रक्षणकर्ती मानतात. असं म्हणतात की, देवीची मूर्ती पूर्वी एका पुरात नदीत
वाहत आली होती. गावकऱ्यांना एका दिव्य आवाजाने सांगितलं की, “मला इथेच स्थापित करा.” तेव्हापासून
देवी त्या जागी विराजमान आहेत. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, धारी देवीची मूर्ती दिवसातून तीन रूपं
धारण करते अशी मान्यता आहे — सकाळी कुमारिका, दुपारी युवती आणि संध्याकाळी वृद्ध माता. त्यामुळे या मंदिराचं
आध्यात्मिक महत्त्व अधिकच वाढतं.
२०१३ च्या उत्तराखंड आपत्तीच्या वेळीही धारी देवी मंदिराचं नाव खूप
चर्चेत आलं होतं. स्थानिकांचा विश्वास आहे की मंदिराची मूळ जागा बदलल्यानंतर काही
तासांतच भीषण आपत्ती आली. कितपत सत्य, कितपत श्रद्धा माहित नाही… पण त्या जागी उभं राहिल्यावर एक वेगळीच
ऊर्जा जाणवते हे मात्र नक्की. मंदिरात दर्शन घेताना, समोरून वेगाने वाहणारी अलकनंदा आणि आजूबाजूची शांत पर्वतरांग पाहताना
मन नकळत स्थिर होत गेलं. प्रवास फक्त ठिकाणं दाखवत नाही… तो आतमध्येही काहीतरी
बदलून जातो, हे पुन्हा एकदा जाणवलं.
पुढे निघालो आणि पुढचा थांबा होता रुद्रप्रयाग संगम. रुद्रप्रयाग
संगमाचं दर्शनही मनात कायमचं कोरलं जाणारं होतं. इथे केदारनाथातून येणारी पवित्र
मंदाकिनी आणि बद्रीनाथाच्या दिशेने वाहणारी अलकनंदा एकत्र येतात. पंच प्रयागांपैकी
हा एक अत्यंत महत्त्वाचा संगम मानला जातो. असं म्हणतात की, नारदमुनींनी इथे भगवान शिवाची कठोर
तपस्या केली आणि शिवांनी “रुद्र” रूपात दर्शन देत त्यांना संगीतविद्या दिली, म्हणून या स्थानाला “रुद्रप्रयाग” नाव
मिळालं. संगमाकडे पाहताना दोन वेगळ्या रंगांच्या नद्या एकमेकांत मिसळताना दिसतात
आणि त्या क्षणी निसर्ग, अध्यात्म
आणि जीवन यांचं अद्भुत मिलन अनुभवायला मिळतं.
अगस्त्यमुनी गावातून जाताना आणखी एक सुंदर पौराणिक कथा कानावर आली.
असं मानलं जातं की भगवान शंकरांचे दोन पुत्र — गणपती आणि कार्तिकेय —
पृथ्वीप्रदक्षिणेच्या स्पर्धेत निघाले होते. कार्तिकेय वेगाने पुढे निघून गेले, तर गणपतीने बुद्धी आणि श्रद्धेचा मार्ग
निवडला. प्रवासात गणपती काही काळ या ठिकाणी थांबले आणि ऋषी अगस्त्यांच्या तपोभूमीत
दर्शन घेतलं, म्हणून या स्थानाला “अगस्त्यमुनी” अशी
ओळख मिळाली असं स्थानिक सांगतात. मंदाकिनी नदीच्या काठावर वसलेलं हे छोटंसं गाव
आजही शांत, साधं आणि आध्यात्मिक ऊर्जा जपून आहे.
डोंगरांच्या कुशीतून वाहणारी मंदाकिनी आणि त्या सोबत चालणारा प्रवास… जणू प्रत्येक
ठिकाण एखादी कथा सांगत होते.
पुढे गुप्तकाशी गाव मागे टाकत प्रवास सुरूच होता. केदारनाथ आता जवळ येत होतं आणि मनातली उत्सुकताही वाढत चालली होती. डोंगरांमधून वळणं घेत घेत आम्ही रामपूर आणि सीतापूरच्या दरम्यान असलेल्या आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. तोपर्यंत बराच उशीर झाला होता. दिवसभराच्या प्रवासामुळे शरीर थकलं होतं, पण मन मात्र अजूनही प्रवासातच धावत होतं. सामान उतरवलं, खोल्या ताब्यात घेतल्या आणि पटकन जेवण उरकलं. बाहेर थंड वारा वाहत होता आणि डोंगरांच्या शांततेतही यात्रेची उत्सुकता स्पष्ट जाणवत होती. बरीच रात्र झाली होती. दिवसभर गाडी आणि ट्राफिक या सगळ्यावर मात केली होती संगम दर्शनाने.
जेवणानंतर उभ्या उभ्याच एक छोटी मिटिंग झाली. दिवसभर अनुभवलेला
ट्राफिक, रस्त्यांवरील गर्दी आणि पुढच्या
प्रवासाचा अंदाज पाहता सकाळी तीन वाजताच सोनप्रयागकडे निघायचं ठरलं. आमच्या
गणितानुसार चारपर्यंत सोनप्रयाग, त्यानंतर गौरीकुंड गाठायला किमान एक तास आणि मग केदारनाथची चढाई
पहाटे पाच-सहा पर्यंत सुरू व्हायलाच हवी… नाहीतर दुपारचं ऊन , एव्हाना होणारी गर्दी,
आणि थकवा सगळं कठीण होणार होतं. प्रत्येक जण आपापल्या मनात तयारी करत होता — कुणी
बॅग तपासत होतं,
कुणी
रेनकोट, टॉर्च किंवा काठी. शेवटी काही तासांची
झोप मिळावी म्हणून सगळे निद्राधीन झालो… पण खरं सांगायचं तर डोळे मिटले होते, मन मात्र केदारनाथाच्या दिशेने आधीच
निघालं होतं. अनेक वर्षांचं स्वप्न आता अगदी काही तासांवर येऊन ठेपलं होतं. हर हर
महादेव!
क्रमश:
प्रा. डॉ. सचिन शंकर गाडेकर
(गडकरी समूह)




.jpeg)



Comments
Post a Comment