बाबा बोलावतात तेव्हाच…” आमची केदारनाथ यात्रा - भाग ७ (गौरीकुंड, जंगलचट्टी आणि रामबाडा)

 

बाबा बोलावतात तेव्हाच…” आमची केदारनाथ यात्रा - भाग

(गौरीकुंड, जंगलचट्टी आणि रामबाडा)

गौरीकुंडला पोहोचून सर्वप्रथम नाश्ता केला. सकाळी तीन वाजता निघालेलो आम्ही भुकेने व्याकूळ झालो होतो. सगळ्यांनी नाश्ता केला आणि केदारनाथ धामाच्या दिशेने पायी प्रवासाला सुरुवात केली. तसा गौरीकुंड हा केदारनाथ यात्रेचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र टप्पा. गौरीकुंडमध्ये पोहोचताच सर्वप्रथम नजरेस पडते ते येथील प्रसिद्ध तप्तकुंड. एका बाजूला हिमालयातून वेगाने वाहणाऱ्या मंदाकिनीचे बर्फासारखे थंडगार पाणी, तर अगदी शेजारीच पृथ्वीच्या गर्भातून उगम पावणारे गरम पाण्याचे कुंड – निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. भाविक मोठ्या श्रद्धेने या तप्तकुंडात स्नान करत होते. यात्रेकरूंच्या सोयीसाठी स्त्री आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्नानव्यवस्था करण्यात आलेली आहे. अनेक जण केदारनाथ दर्शनापूर्वी येथे स्नान करून स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार करत होते. आम्ही महादेवांचे स्मरण करत पुन्हा एकदा बॅगा खांद्यावर घेतल्या आणि केदारनाथाच्या दिशेने पावले टाकू लागलो. खरी परीक्षा आता सुरू होणार होती.


सगळे भरभर पुढे निघाले. किमान सात ते आठ तास किमान चालायचं आहे हे प्रत्येकाला माहित होतचं. जो तो आपल्या गतीने चालू लागला. गप्पा करत, सह्याद्रीची आठवण काढत चढाई सुरु झाली. यात सगळ्यात जास्त त्रास जाणवू लागला तो घोडेवाले आणि डोलीवाले. एकतर चिंचोळा रस्ता आणि त्याच वाटेने मधून वर जाणारे घोडे आणि खाली येणारे घोडे ७०% रस्ता व्यापत होते. त्यांच्या डाव्या अन उजव्या बाजूला जीव मुठीत धरून पादचारी भक्त चालत होते. प्रत्येक मिनिटाला घोडे अंगाला खेटत होते, धक्के लागत होते. घोड्यावर बसलेल्या महाभाग लोकांचे पाय लागत होते. डोलीवाले आणि पिठ्ठूवाले फक्त साईड साईड एवढंच ओरडत त्यांची गती कायम ठेवत होते आणि बाकी लोकांना चालणं थांबवून त्यांना वाट द्यावी लागत होती. सहज म्हटलं तरी केदारनाथ घाटीत किमान १० ते १२ हजार घोडे आहेत. आमच्या चढाई दिवशी तर कडक ऊन, जमिनीवर पडलेली घोड्याची लीद, मलमूत्र, सगळचं त्रासदायक भासत होतं. कोणाचं तरी दर पाच मिनिटांनी त्या घोडेवाल्या सोबत वाद होत होते. तसी त्यांची मुजोरी दिसून येत होती.

मजल दर मजल करत पटकन पहिले चार किलोमीटर संपले आणि जंगलचट्टी ला पोहोचलो. इथपर्यंत जास्त  काही भासले नाही. अजून सूर्य तितका माथ्यावर आला नव्हता. गौरीकुंड मागे टाकत आम्ही पुढील टप्प्याकडे मार्गक्रमण करू लागलो. सुरुवातीचा हा जंगलचट्टीचा भाग तुलनेने सोपा असल्याने फारसा दम लागत नाही. संपूर्ण मार्गावर यात्रेकरूंच्या सोयीसाठी ठिकठिकाणी स्वच्छतागृहे, वैद्यकीय सुविधा आणि मदत केंद्रे उभारलेली आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत किंवा तब्येतीची अडचण आल्यास त्वरित मदत मिळू शकते. पहिला टप्पा अवघा चार किलोमीटरचा असल्याने गप्पा, जयघोष आणि निसर्गाचा आनंद घेत चालणे सुरू होते. हळूहळू सर्वजण आपल्या गतीनुसार पुढे सरकू लागले. काही जण पुढे निघून गेले, तर काही निवांत चालत परिसर अनुभवत होते.


आमचे पुढील लक्ष्य होते – भीमबली. जंगलचट्टी पासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेले हे यात्रेतील एक महत्त्वाचा पडाव. रस्ता चढ-उताराचा असला तरी सभोवताली दिसणारे हिमालयाचे निसर्गरम्य दृश्य आणि मंदाकिनीचा अखंड सोबती यामुळे प्रवास सुखकर वाटत होता. चालताना मध्येच थांबून ऊर्जा मिळवण्याचे छोटे छोटे कार्यक्रमही सुरू झाले. कुठे ताजे टरबूज, कुठे काकडी, तर कुठे लिंबूपाणी आणि फळांचे स्टॉल यात्रेकरूंना आकर्षित करत होते. उंचावरच्या प्रवासात शरीराला पाण्याची आणि ऊर्जेची गरज असते, त्यामुळे अशा थांब्यांवर थोडी विश्रांती आणि खाणेपिणे दोन्ही सुरू होते. सोबत आणलेले पदार्थ एक एक करून बाहेर येत होते. थोडी उर्जा घेऊन परत प्रवास सुरु झाला. आता दोन टप्पे झाले आणि पुढे निघालो.

आता येते रामबाडा. दिशेने चालताना वाटेत एक ठिकाण विशेष लक्ष वेधून घेते – रामबाडा. एकेकाळी केदारनाथ यात्रेतील सर्वात महत्त्वाचा पडाव. गौरीकुंड आणि केदारनाथ यांच्या मधोमध असलेले हे छोटेसे गाव यात्रेकरूंनी नेहमी गजबजलेले असायचे. अनेक हॉटेल्स, धर्मशाळा, दुकाने आणि विश्रांतीची ठिकाणे येथे होती. मात्र जून २०१३ मध्ये आलेल्या भीषण आपत्तीत रामबाडा अक्षरशः इतिहासजमा झाले. अतिवृष्टी, ढगफुटी आणि मंदाकिनीच्या प्रचंड रौद्ररूपामुळे संपूर्ण गाव वाहून गेले. हजारो यात्रेकरू आणि स्थानिकांना या आपत्तीचा फटका बसला. आज त्या ठिकाणी उभे राहिल्यावर निसर्गाच्या सामर्थ्याची आणि मानवी जीवनाच्या क्षणभंगुरतेची जाणीव होते.


२०१३ पूर्वीचा केदारनाथ मार्ग रामबाडामधून जात होता. आपत्तीनंतर तो मार्ग पूर्णपणे नष्ट झाल्याने नवीन मार्ग विकसित करण्यात आला. सध्या यात्रेकरू जंगलचट्टी
, भीमबळी आणि लिंचोली मार्गे केदारनाथकडे जातात. हा नवा मार्ग तुलनेने अधिक सुरक्षित, रुंद आणि व्यवस्थापित आहे. रामबाडा आज गाव म्हणून अस्तित्वात नसले, तरी ते केदारनाथ यात्रेच्या इतिहासातील एक महत्त्वाचे आणि भावनिक पान आहे. त्या भूमीतून जाताना अनेक यात्रेकरू काही क्षण थांबून २०१३ च्या आपत्तीत जीव गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करतात. त्या पुलाच्या सुरुवातीलाच एक बोर्ड आहे. या पुलावरून एका वेळेस ६ घोडे आणि फक्त पंधरा यात्री जाऊ शकतात. अर्थात हे फक्त फलकावर आहे. किमान २५ घोडे, शंभर यात्रेकरू आणि पुलावर फोटो साठी थांबलेले कित्येक जण असतांना हा पूल कसा काय तग धरतोय हे महादेवालाच माहित बाबा. असो.

महादेवांच्या या भूमीत श्रद्धा, संघर्ष आणि निसर्गाचा आदर यांचा खरा अर्थ अधिक प्रकर्षाने जाणवतो. रामबाडा येथील लोखंडी पूल पार करतांना वेगळेच वाटत होते. आता वरती जाऊन आल्यावर हे पटले होते की खरा खेळ तर रामबाडा पुलापासून सुरु होतो. तिथून एकदम खडी चढाई सुरु होते. छोटी लिंचोली आणि बडी लिंचोली ही दोन गावं आपला अंत पाहतात. असो. इथूनच काही काळ घोडेवाले आणि पादचारी यांसाठी वेगळा मार्ग बनवला आहे. इथून थोडा फरक जाणवतो. तरी काही आडमुठे आणि मुजोर घोडेवाले पादचारी मार्गानेच जातात कारण त्यांना इतर घोडे नसल्याने वेग येतो आणि झरझर जाता येते. किती तरी लोक त्यांना ओरडत होते पण कोणाला फरकच पडत नव्हता. आम्ही हे सगळं पाहत पुढे चालत होतो आणि मार्गक्रमण सुरूच ठेवलं.

                                            


क्रमश:

प्रा. डॉ सचिन शंकर गाडेकर

(गडकरी समूह)







Comments