आता सारं काही अवघड जाणार २५/५/१७

आता सारं काही अवघड जाणार  २५/५/१७
तुम्ही समोर दिसलात की आनंद होतो. तुम्ही बोललात तर काळीज सुखावते. तुम्ही सोबत असलात की सगळी दुनिया आलबेल वाटते. तुम्ही चार गोड शब्द बोललात तर अख्खी दुनिया जिंकल्यासारख वाटत. तुम्ही आठवण काढली तर बाकी सगळ विसरायला होतं. हे सगळं जरी थोडं साहित्यिक वाटत असेल पण सत्य आहे. कुणाला शंका असेल क्षणभर डोळे मिटून पहा अन विचारा त्या मनाला त्याचे काय उत्तर आहे यावर.
काय आहे ना, काम सगळेच करतात, कामात सारेच दिसतात, या भरगच्च देशात एकत्र काम करणाऱ्यांची कमी नाही. एका मागे हजार लोक काम करतात. त्या एका लोकल मध्ये हजारो ते लाखो लोक रोज प्रवास करतात. कुणाचा कुणाशी काडीमात्र संबंध येत नाही. सगळे कसे आपापल्या विश्वात अन कामात दंग, व्यग्र आणि गुंतलेले भासतात. या प्रकारात आम्ही मोडत नाही एवढाच काय तो आमचा दोष.
काम करता करता एक लक्षात आले की विनाकारण लोक एकत्र येतात का? का तो विधाता आम्हाला इकडे तिकडे फिरवतो अन दर वेळेस नवनवीन लोकांच्या संपर्कात आणतो? काय रे जन्मदात्या? प्रत्येक गोष्टीला किती खेचतोस आणि का इतका प्रयोगाचा अट्टहास माझ्याशी अन आमच्याशी. आम्ही एक एक कडी जोडत बांधलेली ही वज्रमूठ कोणीच खोलू शकत नाही, तू ते करतोस अगदी सहज, निर्दयपणे आणि क्रूरतेने.
तू ही सगळी चमत्कारिक मंडळी एकत्र आणतोस. सगळे वेगवेगळे, बारीक, जाड, सुकडे, सडपातळ. कोणी अगदी हळवा तर कोणी किती निष्ठुर. कोणी किती दुखा:तून उभा राहिलाय तर कोणी लाडातून वाढलाय. कोणी नशिबानं फाटला तरी उभा राहिला तर कोणी नशिबाला लाथ मारून नवा जन्म घेऊन आलाय. हे सारे अजब गजब लोक एकत्र आणलेस, त्यांना प्रचंड जीव लावायला शिकवतोस, त्यांना एक जीव करून टाकतोस आणि मग मात्र हुरहूर लावतोस ती दुराव्याची. दूर जाण्याची. सगळ काही नहीवत करण्याची.
एकामेकांना दूर गेल्याने फार काही फरक पडणार नाहीच मुळी पण आता सार आता सारं काही अवघड जाणार. आलेला कामाचा डोंगर सहज पार करत होतो आपण सारे, आता मात्र एक एक पाऊल जड जाणार टाकायला.
आलेल्या समस्या धडाधड सोडवत होतो आपण सारे,  आता मात्र एक एक प्रश्न झुलवणार नक्की.
छोटे छोटे प्रसंग आणि छोटे छोटे यश कसे आवाज करत साजरे केलेत आपण आता मात्र हिमालय जरी पार केला तरी झेंडा कुणाकडे द्यावा हा प्रश्न.
सुख आणि दुख: यातील फरक तुम्ही अन तुमची साथ आहे.
यश आणि अपयश यातले अंतर तुमची साथ आहे.
आठवण आणि साठवण याचा परिपाक तुम्ही आणि यश आणि सिद्धी याचा प्रवास तुम्ही.
जीवन आणि जगण्याचा सहभाग तुम्ही.
असेच जवळ आणि आपले रहा तुम्ही.

                ---सचिन गाडेकर

Comments