शेतकरी संपावर जातोय ... (३१/५/१७ )

शेतकरी संपावर जातोय ... (३१/५/१७ )

१ जूनपासून  शेतकरी संपावर जातोय. या गोष्टीकडे राजकीय, सामजिक अथवा कुठल्याही दृष्टीने पाहिले तरी ही वेळ त्यावर का आली हा विचार केला पाहिजे. आयुष्यभर काबाडकष्ट करणारा तो शेतकरी कधीही थकत नाही. तो कधीही हरत नाही. दर वेळा तो पाउस पडताच मागचा पुढचा विचार न करता काळ्या मातीत बियाणे फेकून सुरवात करतो नव्या अंताची. होय, अंताची. कशात मरत नाही तो? नांगरणीचा एकरी भाव विचारून पहा, बियाणे काय भावाने मिळतात हे विचारा,(वेळेवर मिळतात का ते पण पहा) शेतीसाठी लागणारी खतांचा भाव विचारा आसपास. नंतर खुरपणी, मळणी आणि विचारु  नका. बरे यात विजेचा लपंडाव नशिबाशी बांधलेला. भारनियमनाप्रमाणे त्याने जगायचे. मजूर मिळणे किती दुष्कर आहे हे जरा येऊन पहा म्हणा कारभारी लोकांनी.

आता मध्ये येणारे रोग, लकवे तर मोजायचच नाही. गेली ३ वर्षे पाण्याचे दुर्भिक्ष होते. उत्पादन शून्य झाले मग तो कसा काय जगला? त्याने काय खाल्ले असेल? लातूर ला प्यायला पाणी ट्रेनने गेले म्हणजे तेथील शेतकरी काय करत असेल हे मतीमंद माणसालाही कळेलच ना. मग तरी वर तोंड करून कसे काय लोक विचारताय की शेतकरी का दु:खी आहे. बऱ त्याला एकदा पिक आले की निसर्ग उल्टा वार करणारच. आलेले पिक गारपीट, वारा आणि  अवकाळी पाऊस आहेच पाचवीला पूजलेलाच आहे. यया सगळ्यातून तो वाचला, जगलाच तर आलेल्या पिकाला, मालाला भाव काय मिळतो? कवडीमोल भावात विकून काय कमावतो तो? जुनं कर्ज नवं करण्याचं फक्त भाग्य त्याचं. मागचं खरकट आवरायचं आणि नवा डाव मांडून परत गुलामीत जायचं.

बऱ आता त्याने संपाचा पवित्रा का घेतला याचा विचार करत त्यावर मंथन करायचे सोडून उद्दाम लोक त्याला चुकीचे ठरवत आहे. अरे तो पिकवणार नाही तर खाणार काय? जगणार कसा? असे तो जगतोच आहे कुठे? त्याचा श्वास अन श्वास तुमचा गुलाम आहे. अर्धे जीवन बँकेचे उंबरे झिजवून मरतो तर बाकीचे सावकारापुढे हात पसरून. त्याला काय मरणाची आणि अडचणीत येण्याची भीती दाखवता? आम्ही पिकवू वा जाळून टाकू पण आमचा मुलभूत अधिकार आहे अन्याय पुढे प्रतिकार करण्याचा. का फक्त तो पेट्रोल पंप आणि व्यापारी आणि नोकरदार वर्गाला आहे का? असे मारायचे तर तसे मरेल तो. 

माननीय माधव भंडारी की कोणीतरी काल परवा म्हणतात की नाही पिकवले तर आयात करता येते. शेतकरीच अडचणीत येतील. अरे लाज वाटली पाहिजे असे बोलताना. नुकसान शेतकऱ्यांचे आहे म्हणे. अरे तो फायद्यात होताच कधी? त्याला मरण जवळचे आहे या फालतू जीवनापेक्षा. त्याला चुकीचे ठरवण्यापेक्षा त्याला किती समजलात? आयात करू शकतो म्हणे. संप करून किमान शेतकऱ्यांच्या समस्या कळतील की या मरणयातनेत तो आहेच जन्मत:च. फक्त कुणी गळफास घेतो तर कुणी झुरत झुरत मरतो एवढेच.

असो, एवढं राग येण्याचं कारण त्या कष्टकरी शेतकऱ्यांना कमी लेखन्याने. तो १०० % एकत्र येऊ शकणार नाही पण ज्योत से ज्योत जलाते चलो. एवढसं कळले की तो संपावर नाही सरणावर जात आहे, संप यशस्वी आहे. त्याला नकोय कर्जमाफी बीफी. त्याच्या पिकवलेल्या सोन्याची फक्त मातीमोल किमात करू नका. बस्स...... आता यल्गार झालाच आहे तर होऊन जाऊ द्या.

होऊन जाऊ द्या लढाई आता आरपार......

                                              --सचिन गाडेकर

Comments