विरभद्र आणि मायंबा यात्रा

सालाबादप्रमाणे राहाता गावची विरभद्र आणि  मायंबा यात्रा 2018 साजरी होतीय. या निमित्ताने काही लिहावंसं वाटणं साहजिकच आहे म्हणून हा प्रयत्न.

यात्रा म्हटलं तर गगनाला भिडत आध्यत्मिक उंची गाठण्याचे ध्येय देणाऱ्या देवाच्या काठ्या एक वैशिष्ट्य असते. त्या काठीवर मोराचे पीस लावलं जातं. विद्या, ज्ञान तर प्रथम स्थानी आहेच आपल्याकडे. धर्म आणि बुद्धी यांचा मेळ असावा हा. रंगीबेरंगी निशाण फडकत डफावर ताल धरत काठ्या नाचवल्या जातात.गावातील पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा. सर्व गावकरी या काळात एकत्र येतात. बेट/ मळे सगळे हेवेदावे विसरून काठी नाचवत देवास आळवतात.  जड भासणारी काठी लीलया उचलत ठेका धरतात सगळे. अतिशय वेगळा अनुभव ठरतो तो.

या यात्रेत देवाचा गाडा म्हणजेच गळवंती मात्र सर्वात मोठे आकर्षण असते. चार बैल ओढतील असा पारंपरिक गाडा दरवर्षी तयार करत  रोषणाई केली जाते. एक डफ आणि त्यावर पडणारी काठी अन थाप प्रचंड उत्साह भरून जाते. समस्त वातावरण भक्तिमय होऊन जाते. अनेकविध व्यवसाय करणारे एक गोल करून जेंव्हा या डफावर नादब्रम्ह उभे करतात तो क्षण अजबच. गाडा गावभर जात परिक्रमा पूर्ण करतो.

उशिरा गळी लागण्याची प्रथा आहे आणि अजूनही ती टिकून आहे. देवाशी मनोमन सांगितलेले यत्न करत प्राप्त करायचे आणि यात्रेच्या दिवशी ते ईश्वराने केले असे म्हणत त्याला ते यश समर्पित केले जाते. किती छान उद्देश असेल या नवसामागे!
या निमित्ताने अनेक विभक्त कुटुंब एकत्र येत *देवाचे गण* जेवू  घालतात. किती योग्य संकल्पना असेल की यात्रेत येणाऱ्या यात्रेकरूंना  जेवण (प्रसाद) दिला जात असे आणि त्याला महत्व होते आणि आजदेखील आहे. आज देखील संगे सोयरे, मित्र मंडळी यांना आमंत्रण देऊन बोलावून हा गण घातला जातो.

पंचक्रोशीतील नागरिक मोठया उत्साहाने यात भाग घेतात. नकळत बाजारपेठ फुलते. खेळणी, रहाटगाडगे आणि मनसोक्त खाण्याचं ठिकाण बनते यात्रा.लहान सहान बाळांना तर पर्वणीच असते. प्रत्येक जण मनापासून आनंद लुटतो आणि 2 दिवस सगळा गाव कसा एकसंध दिसतो. हेच काय ते गमक असावे या यात्रेचे. सगळे एकत्र येतात, देवास आठवतात, आनंद घेतात यापेक्षा वेगळे काही जास्त हवे नसावे विधात्यास ही आम्हा मर्त्य जीवांकडून.

पुन्हा एकदा या जुन्या परंपरा जपणाऱ्या सर्वांना धन्यवाद ।

Comments