लग्न सोहळे आणि मंगलाष्टकं .

लग्न सोहळे आणि मंगलाष्टकं .... २१/४/१८

मागच्या आठवड्यात एका लग्न सोहळ्यात जाण्याचा प्रसंग आला. प्रसंग या साठी कारण तिथे गेल्यावर जो प्रसंग  अनुभवास आला त्यावरून हे सदर लिहावेसे वाटले. आवर्जून आलेले आमंत्रण कसे नाकारावे, नाही का? मस्त रणरणत्या उन्हात तप्त होत मंगल कार्यालयात पोहोचलो. आधीच उन्हात तप्त झालेली काया आता उकळत्या तेलातील भजीप्रमाणे झाल्यासारखी वाटत होती.

त्या दिवशी सरासरी तापमान ४० सेल्सियस असावे. प्रचंड उकाडा आणि संपूर्ण अंगात फक्त आणि फक्त घामाच्या धारा बोलत होत्या. हॉल तसा हवेशीर होता, सर्व पंखे जोरात गरम हवा लोटत होते. वरती असणारा पत्रा जणू जुने हिशोब हाडवैर  असल्याप्रमाणे चुकते करत होता. प्रजा नाईलाजाने बसलेली होती. बरचसं काही चाललं होतं सभोवती. एक मोठा फरक हा होता की या लग्नाला आलेली ज्येष्ठ मंडळी मिळेल तो विषय चघळत होती. एकमेकास विचारत होती. दुसरीकडे सगळा तरूण वर्ग ग्रुप मध्ये बसून फक्त आणि फक्त मोबाईल हातात धरत गप्पा मारत होते. त्यात नजर जास्त करून फोनवर आणि कान मित्रांकडे. अर्थात हे आता सवयीचे करून घ्यायला हवे एवढेच.

लग्न सोहळा नेहमीप्रमाणे निवांत,वेळ घेत तब्बल २ तास उशिराने लागले. वरदेव आणि मंडळी या उन्हात देखील ‘तुझी चिमणी उडाली भुर्रर्र....आला बाबुराव....शांताबाई’ च्या ठेक्यावर नाचून नवरदेवाने त्यांच्या लग्नात नाचून केलेल्या उपकरातून उतराई होत होते. या उन्हात ही अशी दोस्ती विरळच नाही का! त्यात लग्नात वाजली जाणारी गाणी तर नेहमीचीच झालेली आहेत. थोडी बिभत्सता टाळली तर हा वरात नावाचा प्रकार तसा भारीच. अर्थात एवढे ऊन  असताना संध्याकाळी मिळेल तो मुहूर्त (जो ९९% लोक पाळत नाही.)घेत सर्व काही सुखरूप होऊ शकते पण हा निर्णय ज्याचा त्याचा आहे.

लग्न लागत असताना एक रूढ झालेला प्रकार दिसला. गुरु किंवा भटजी जे मंगलाष्टके म्हणतात त्यासोबत अनेक हौशी व्यक्ती आपली गायनाची हौस भागवताना दिसले. त्यात सूर , ताल, लय तर अपेक्षितच नाही म्हणा परंतु किमान आपला गळा किती भसाडा झाला आहे आणि तो लग्न वेदीवर असणाऱ्या लोकांना  आणि बसलेल्या लोकांना किती टोर्चर होत असेल हे न बोललेलेच बरे. बरं आवाज जाऊ द्या पण किमान जे मंत्र बोलत आहोत त्याचे काही भान? किती अशुद्ध आणि अस्पष्ट उच्चार करतात हे लोक...काही तरी पावित्र्य असते मंत्रांचे. एखादा कानामात्रा तरी इकडे तिकडे झाला तरी संस्कृत मध्ये अर्थ बदल होतो अथवा विपरीत अर्थ उभा राहतो हे कसे सांगावे या उत्साही महाभाग जणांना? डोळ्यासमोर कुणी देववाणीचा असा मर्डर करताना पाहून मनपटलावर इतक्या वेदना होत होत्या की बस. कोणी मंत्र म्हटले हा प्रश्न नाही पण जे मंत्र म्हणत आहोत ते काय आहेत? त्यांचा संदर्भ काय आहे? किमान अर्थ काय आहे? हे सगळं पायदळी तुडवत फक्त बेसूर आवाजात ‘सावधान’ म्हणणे काय कौतुक आहे देव जाणे.

असो, अजून काही आहे सांगण्यासारख पण ते पुढच्या सदरात लिहितो कारण अजूनही डोक्यात ‘मच्छ्या पासून ....कलंकी पुढे दहावा.....’ फिरत आहे. संस्कृतचे श्लोक आहेत ते आणि त्यांचे उच्चार आणि पावित्र्य जपले जावे एवढेच काय ते अपेक्षित.

--- सचिन गाडेकर

Comments