कर्मप्रवृत्ती आणि आपण २
कर्मप्रवृत्ती आणि आपण २८/४/१८
Not failure but low aim is a crime. या महानुभावांच्या उक्तीप्रमाणे अपयश हा प्रश्न नसून ध्येयाचा अभाव असणे चुकीचे आहे. व्यक्तीला मिळणारा दिवस हा परत येणारा नाही हे त्रिकालाबाधित सत्य माहित असून देखील कित्येक जन येणारा दिवस फक्त लोटून देण्यात सार्थक मानतात. रोज नवनवीन करावे असा आग्रह जरी नसेल तरी किमान काही विचार नवे असावे, किमान काही पाऊल नव्या उमेदीने टाकवीत. रोजच्या त्याच त्याच रहाटगाडग्याचे काय कौतुक असणार हा विचार नकारात्मक आहे.
सकाळी उठून एखादे नवीन सदर वाचले जाऊ शकते. एखादी उक्ती पेपरातून मस्त कापून संग्रही करता येऊ शकते. काहीजण तर दिवस उगवला तर तो कधी मावळून उद्याचा उगवेल जेणेकरून तो देखील तसाच घालवू असा विचार करतांना दिसतात. माणसाला काही नवीन केले नाही तर गुदमर झाली पाहिजे. एखादा दिवस मोकळा गेला तर चिडचिड व्हायला हवी. काहीतरी चुकते आहे असे वाटून जायला हवे. आयुष्यात नवीन भर नाही पडली म्हणून रितेपण भासायला हवे. अर्थात यासाठी लागते दुर्दम्य इच्छा.
रोज असे वाटते की नेहमीच्या कामावर, ड्युटीवर, नोकरीवर शेतावर जाणारा संध्याकाळी काहीतरी वेगळा दिवस जागून आला तर समाधानाने झोपत तरी असेल. जे महाभाग दिवस फक्त कडेला लावतात त्यांना निद्रिस्त होतांना काय बरे वाटत असेल? काय पुरुषार्थ केला असे उत्तरत असतील स्वत:स ? घरी असेलेली अथवा नोकरी, शेती करत हातभार लावणारी अर्धांगिनी कधीतरी विचारत असेलच ना? तिलाही हे वाटत असेलच ना की आयुष्य का एवढे रटाळ आणि अर्थहीन बनत चालले आहे?
रोज रोज भेटणारे, बोलणारे. एकत्र काम करणारे कधी इतरांना माहित नसलेला एखादा प्रसंग सांगत खुश करत असतील? नकळत बोलता बोलता एवढ्यात वाचलेलं चटकन सांगत इतरांस प्रेरणा देत असेल? कधी या व्यक्ती स्वत: मिळवलेलं ज्ञान हळुवार प्रसारित करत असतील? कोण कधी पांचट गप्पा पेक्षा प्रगल्भ करणारी बैठक बसवत मजा आणि चर्चा करत असतील? काय हे होणे अपेक्षित नाही काय? चहाचा घोट सुध्दा चार कानगोष्टी देऊ शकतो ना? तत्यात हाताला काम आणि डोक्याला ताप नसेल तर होणाऱ्या गप्पा आणि चर्चा नकोश्या असतात कारण त्यांना न भूतकाळ न भविष्यकाळ. वर्तमान तसाही वायाच घालवला जात असतो.
यात एक गोम अशी आहे की अशी लोक आसपास असतील तर आपण खूप जास्त प्रयत्नवादी असायला हवे. नकारात्मक लहरी जरा जास्तच काम करतात आणि आपसूक आजूबाजूच्या लोकांना प्रभावित करतात. आजूबाजूला सतत होणारी नकारात्मक आणि कर्तृत्वहीन बडबड त्रास देऊ लागते. गरज असते ती दुप्पटीने विधायक, सकारात्मक कामे करण्याची. कोणी कसेही आयुष्य जगोत तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु त्याने आपले एक कष्ट करण्याचे मुलभूत सिद्धांत बाधित होऊ नये एवढेच.
म्हणून सुरवात हीच होती की कमजोर ध्येय असणे चुकीचे आहे, गुन्हा आहे. किनारा तुला पामराला सांगत कविराज मानवात असलेल्या कर्तृत्वाला आवाहन करताय. हरेक दिवस एक नवे पर्व असेल आणि नवा श्वास असेल हा ध्यास.
--- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment