flying birds (तणाव मुक्त शिक्षण आणि बालमानसशास्त्र ) भाग २ ६/४/१८

flying birds (तणाव मुक्त शिक्षण आणि बालमानसशास्त्र ) भाग २ ६/४/१८

डॉ. ओंकार जोशी हे प्रख्यात बालमानसशास्त्रज्ञ आहेत. शिर्डीत त्यांनी आपल्या भागातील पहिले निवासी व्यसनमुक्ती केंद्र देखील सुरु केले आहे. त्यांचे समुपदेशन ऐकणे विशेष अनुभव होता. त्यांनी सुरवातीलाच काही मुलभूत गोष्टी स्पष्ट केल्या आणि ऐकणारा वर्ग एकचित्त झाला.

सुरुवातीला आजच्या काळात पालकाकडून नकळत बोलले जाणारे आवडते शब्द म्हणजेच ‘आमच्या वेळी असं नव्हतं.’ हे स्पष्ट केले. आपण आज नवीन पिढीला आपल्याच फुटपट्टीने मोजत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आज काय चित्र आहे हे खूप सरळ भाषेत स्पष्ट केले.

ते म्हणाले की आज मुलांमध्ये प्रचंड बदल पहावयास मिळतात.
त्यांना स्वत:ची जाणीव आहे. मी मुलगा आहे, मी मुलगी आहे हे प्रकर्षाने नमूद करत तसेच वागतात.
आजची पिढी स्वत:ची वेगळी आवडनिवडीचे भान ठेवते.
या डिजिटल पिढीची मुळातच आकलन क्षमता जास्त आहे.
त्यांच्यावर संवेदनाचा सतत मारा होत आहे.
आज खूप जास्त स्पर्धा आहे आणि स्पर्धा जास्त असल्याने अपेक्षा देखील वाढल्या आहेत.
अपेक्षा वाढल्या आहेत म्हणू तणाव सुध्दा जास्त आहे.

ते पुढे म्हणाले की आज शिक्षकांमध्ये प्रचंड बदल पहावयास मिळतात.
आज सगळीकडे गर्दी वाढल्याने जबाबदारी वाढलेली दिसते.
शिक्षकांना आजकाल शिकवण्यापेक्षा शिक्षकेतर कामे खूप लादली आहेत.
बऱ्याच ठिकाणी उत्तम साधनांची कमतरता भासते आहे.
अनेकदा शिक्षकाचे शिक्षक बनणे हे पहिल्या पसंतीचे करियर नाही.
आजच्या मुलांची मानसिकता खूप बदललीय.
बरेच शिक्षक आज देखील जुनी शैलीच वापरत शिकवतात.

ते जाऊन पुढे म्हणाले की आज आसपास समाजामध्ये  खूप सारे बदल दिसतात.
आज तर टीवी आणि मोबाईल मुळे वातावरण खूप विचित्र झाले आहे.
आज समाजाची यशाची व्याख्या बदललेली दिसते.
आर्थिक गणिते सुध्दा खूप बदललेली आहेत.

पुढे महत्वाच्या म्हणजेच पालकाबाबत ते म्हणाले की आज पालक कसे आहेत?
आज बऱ्या पैकी आर्थिक परिस्थिती सुधारलेली दिसते.
कुटुंब तर एकत्रित कडून एकदम विभक्त वर येऊन ठेपले आहे.
संपूर्ण घरात एक किंवा दोन लहान चिल्लीपिल्ली असल्याने सर्वांच्या अपेक्षा खूपच जास्त आहेत.
धकाधकीच्या जीवनात कुटुंबाला वेळ देणे मात्र दुष्कर झाले आहे.
कुटुंबात संवाद कमी तर विसंवाद जसर होताना दिसत आहे.
आजचे पालक पाल्यांना मागणी केल्या केल्या पुरवठा करताना दिसतात.

या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. सेट झाले होते. प्रत्येक विचार अलगद पालकांच्या आणि शिक्षकांच्या मस्तिष्कात जात होता. डॉ. पुढे म्हणाले कि आजच्या मुलांना बहुपदरी बुद्धिमत्ता लाभली आहे. कारण फक्त अभ्यास म्हणजे हुशारी नाही. फक्त पाठांतरचा एकच पदर आज गृहीत धरून चालणार नाही. कारण गप्प बसा, बोलू नका या जुनाट संकल्पना केंव्हाच कालबाह्य झाल्या आहेत. बालकांच्या मेंदूला जितक्या संवेदना जास्त तितका विकास जास्त संभव आहे.

हा झाला अर्धा भाग. आता अजून महत्त्वाचा आणि गाभा असणारा भाग पुढच्या लेखात उद्धृत होईल.

---- सचिन गाडेकर

Comments