flying birds (तणाव मुक्त शिक्षण आणि बालमानसशास्त्र ) ६/४/१८
flying birds (तणाव मुक्त शिक्षण आणि बालमानसशास्त्र ) ६/४/१८
परवा शाळेत flying birds (तणाव मुक्त शिक्षण आणि बाल मानसशास्त्र ) त विषयावर प्रख्यात मानसोपचार तज्ञ डॉ. ओंकार जोशी यांचे समुपदेशन ऐकण्याचे सद्भाग्य लाभले. सरांनी बालक, पालक आणि शिक्षक यांना उद्देशून मार्गदर्शन केले. सदरचे मार्गदर्शन ऐकून त्यावर व्यक्त व्हावेच लागले असे उत्कृष्ट ते बोलले.
या कार्यक्रमाच्या आखणीमध्ये मोलाचा वाटा होता तो सौ. अपर्णा निलेश गाडेकर यांचा. त्या स्वत: माझ्या शाळेच्या पाल्याच्या पालक आहेत. स्वत: व्यवसायाने फार्मासिस्ट आहेत. त्या सध्या landmark forum च्या चिंतनातून खूप प्रभावित झालेल्या आहेत. तत्यांनी त्यांच्या एका प्रोजेक्टचा भाग म्हणून एक उत्तम विषय निवडला आणि तो होता ‘’तणावमुक्त शिक्षण आणि बालमानसशास्त्र’’ त्या स्वत: एक पालक असल्याने त्यांना सातत्याने भासणाऱ्या, अनुभवास येणाऱ्या आणि थोड्या जटील वाटणाऱ्या समस्या त्यांना सोडवायच्या होत्या. या पार्श्वभूमीवर हा प्रोजेक्टची आखणी झाली.
आता निर्धार झाला होता पण पुढंच पाऊल काय हे थोडे गुलदस्त्यात होते. त्या स्वत: मान्य करतात की त्या खूप नर्वस होत्या सुरवातीला. कधीच कुठेही जाहीरपणे सहभाग न घेणारी व्यक्ती आज एकदम फ्रंटफुटला येऊन आव्हाने झेलायला तयार झाली होती. त्यांनी ठरल्याप्रमाणे शाळांची निवड केली. स्वत:ची कन्या शिकत असलेली शाळाच उत्तम पर्याय वाटल्याने त्या माझ्याकडे आल्या. त्यांनी ऐकवलेली संकल्पना पटली आणि काही आखणी करत आम्ही कामाला लागलो. काही शिक्षक आणि आम्ही अशी टीम तयार झाली. सर्वाना पूर्व कल्पना देत सुरवात झाली.
दोन तीन भेटी आणि त्यात बऱ्याच गोष्टी आणि पुढील चित्र स्पष्ट झाले. सुरवात एका मास्टर स्ट्रोकने व्हावी हा मानस असावा आणि यामुळे अपर्णाजी यांनी एक कल्पना मांडली. कल्पना अशी होती की एका बालमानसशास्त्र जाणकार डॉक्टरांना भेटून त्यांना एक सेशन घ्यावयास विनंती करू. या प्रोजेक्टचे महत्त्वाचे अंग म्हणजे पालक आणि शिक्षक या दोघांना हे समजावे आणि ते रुजावे असे इप्सित होते. यासाठी शिर्डीतील प्रख्यात मानसोपचार तज्ञ डॉ. ओंकार जोशी यांना विनंती करण्यात आली आणि ते लगेचच तयार देखील झाले. अर्धी लढाई जणू जिंकली असे टीमला भासू लागले. शालेय व्यवसस्थापन देखिल अश्या उपक्रमास नेहमी प्रोत्साहित करत असते.
शालेय प्रशासन आणि टीमने होमवर्क करत सर्व पालकांना आमंत्रित केले. दिवस आणी वेळ ठरली. एक ठिकाण निश्चित करून सर्व आवश्यक सोपस्कार करण्यात आले. सकाळी ठरल्या वेळेप्रमाणे डॉ. जोशी पोहोचले. ओळखपरेड झाली आणि विषय मसुदा चर्चिला गेला. त्यांचा सत्कार एक वाचनीय पुस्तक देऊन व्यवस्थापनातर्फे सत्कार करण्यात आला. थोडी पालकांची उपस्थिती कमी जाणवली परंतु डॉ. ओंकार जोशी यांचा उत्साह अजिबात कमी झाला नाही. आले ते आपले आणि तेच श्रोते अस म्हणत त्यांनी शंखनाद केला. पूर्ण व्याख्यान हे प्रत्येक पालकाने आवर्जून ऐकावे असेच होते. एक एक वाक्य सैद्धांतिक आणि अनुभव आधारित होते. त्याचे पूर्ण विवरण पुढच्या लेखात येईल कारण एका लेखात हे सगळं गुंफणे शक्यच नाही.
---- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment