flying birds (तणाव मुक्त शिक्षण आणि बालमानसशास्त्र ) भाग 3
flying birds (तणाव मुक्त शिक्षण आणि बालमानसशास्त्र ) भाग 3
डॉ. ओंकार जोशी यांनी सुरवातीलाच स्पष्ट केले होते की मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या जाताहेत आणि त्यातून तणाव उभा राहतोय. हा उभा तणाव कमी करण्यासाठी एका मानसोपचारतज्ञ म्हणून काही महत्त्वाची सूत्रे डॉक्टरांनी पुढे सुचवली.
•हा पालक, शिक्षक आणि पाल्य हा तणाव कमी करण्यासाठी सर्वप्रथम त्यांमध्ये त्रिकोणी सुसंवाद व्हायला हवा.
•मुलांना स्वत: पडलेले प्रश्न न घाबरता मांडता यायला हवे किंवा ते मांडू दिले पाहिजेत.
•मुलांसाठी जुनी रूढ पद्धत म्हणजे परीक्षा ही स्मरणशक्ती मोजण्याची मोजपट्टी नाही.
•मुलांची आकलनक्षमता पहा आणि ती वृध्दीन्गत झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करा.
•मुलांसाठी फक्त पाठ्यपुस्तकी अभ्यास समोर न ठेवता खेळ आणि कला यांना देखील जास्त वाव द्या. आज तर खेळ आणि कला यांना बाजूला सारत मुलांना फक्त गुंतवून टाकले जाते.
•कोणत्याही पाल्याला लेबलं लावू नका. (डॉक्टरांनी हि कळकळीची विनंतीच केली की एखादं नाव अथवा एखादी झालेली चूक धरून त्यांना लेबल लावू नका.)
•मुलांच्या चुकांपेक्षा वर्तनाची चर्चा करा. त्यांच्याशी बोला. त्यांना सांगा की हे बरोबर होते, मला हे आवडले नाही , हे असे करू नये.
पुढे डॉक्टरांनी पालक या घटकावर जोर देत काही महत्वपूर्ण बाबी समजावल्या.
•My child is ‘my child’ yet not an extension of me.
माझा मुलगा वा मुलगी माझे स्वप्न पूर्ण करेल, मी जे नाही करू शकलो ते त्यांनी करावं हे असे अपेक्षांचे ओझे आपण त्यांवर लादत जातो. आपली अपत्ये ही आपली अधुरी स्वप्ने पुरी करण्यासाठी आणि त्यासाठी तणाव घेण्यासाठी नाहीत. (दहावी, बारावीत असलेल्या मुलांना पालक बजावतात की आपल्या खानदानात अजून कोणीच ८०% च्या खाली आले नाही. बघ, नाक कपू नकोस आमचे ..वगैरे..वगैरे...)
•I do not make my child’s future. I help him to develop his own future.
मीच माझ्या पाल्याचे भविष्य घडवेन हे म्हणणे साफ चुकीचे आहे. आपण फक्त त्यांना मदत करू शकतो अथवा करावी पण अमुक एक गोष्टीचा अट्टहास चुकीचा आहे.
•पालकत्व हा माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे पण पालकत्व म्हणजेच माझे आयुष्य नाही.
हा मुद्दा तर डोक्यात मुंग्या देऊन गेला आणि क्षणभर पटलाच नाही. पण डॉक्टरांनी समोर बसलेल्या श्रोत्यांच्या चेहऱ्यावरील भाव ओळखत समजावले की आपण पालकत्व सर्वस्व करून टाकतो ते देखील काही काळापुरते. समजा मुले दहावीला आली की मग सर्व black out सारखे वागू लागतो. फोन बंद, टीवी बंद, बाहेर जाणे बंद. किती मागे लागतो आपण आणि ते देखील अश्या काळात जेंव्हा मुले सर्वात जास्त तणावमुक्त हवेत. काही पालक ते चक्क निरोप देत जाहीर करतात की हे दहावीचे वर्ष आहे आम्ही वर्षभर कुठेच जाणार नाही आणी येणार नाही. किती का अतिरेक आणि तो देखील आपल्या पद्धतीने.
•या नंतर सूत्र दिले ते हे असे ‘आदर्श पालकत्व हा एक गैरसमज आहे.’ कारण ‘आदर्श मुल हे देखील हे एक मिथक आहे.’ (Ideal Parenting is a myth because ideal child is also a myth.)
मुलांमध्ये असणारे गुण पाहू आणि त्यांना प्रतिसाद देऊ. कोणीच आदर्श पालक वा बालक नसते. गडबड हि होते कि आपण फक्त चुका पाहतो. गुणग्राही बना. यासाठी प्रभावी पालकत्व या कडे जाऊया. प्रभावी पालकत्व असणे शक्य आहे, वास्तव आहे.
•पुढे डॉक्टरांनी औषधाचा एक कडू परंतु अत्यंत परिणामकारक डोस दिला. पालक म्हणून काही मुलभूत बदल आणि शिस्त आपणास अंगीकारावी लागेल. जे घरी असू तर एकत्र टीवी पाहू, एकत्र लक्ष देऊ. आपण नेमके असे करतो की आम्ही टीवी पाहणार आणि मुलांनी तिकडे बसून अभ्यास केला पाहिजे, वाचन केले पाहिजे, होमवर्क केला पाहिजे. आम्ही मोबाईल वापरत बसतो आणि त्त्यांनी मात्र मोबाईलला हात देखील लावायचा नाही. हे बदला. सगळे टीवी पाहू आणि त्यांच्या अभ्यासावेळी आम्ही पण टीवी पाहणार नाही. मोबाईल ना तुला, न मला. सगळे विना मोबाईल, टीवी वेळ देऊन एकमेकांना. त्यांचा अभ्यास घेऊ अथवा गप्पा मारू. त्यांचे मनातील ऐकू.
•डॉक्टरांनी नंतर हे देखील समजावले की अपेक्षित परिणामांची अपेक्षा करा पण हट्टी मागणी टाळा. अमुक एक यावं हे ठीक आहे पण आलंच पाहिजे, झालंच पाहिजे... हा.. च...आला की मग तणाव येतो. आणि हा तणाव योग्य नाही. स्वीकार करा की आपण १००% परफेक्ट नाही. आपण जर १००% परफेक्ट नाही तर आपला पाल्य अमुक बनवा आणि असावा हि मागणी, हट्ट किती रास्त आहे?
•समापणापूर्वी डॉक्टरांनी एक मूलमंत्र दिला.
१. मुलांच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्याचा आनंद घ्या. (Enjoy the process of every stage.)
२. पालकत्व प्रक्रिया ही ‘कर्मयोगाचा’ सराव करण्याची संधी आहे. (थेट भगवद्गीतेचा संदर्भ आपल्या मार्गदर्शनात आणत पालकांना सुचित केले.) हा कर्मयोग रोज करायचा आहे पण खूप जास्त महत्त्वाचा आहे.
अश्या प्रकारे डॉक्टरांनी आपले मौल्यवान मार्गदर्शन पालक आणि शिक्षक यांना केले. सर्व उपस्थित सेशन नंतर अंतर्मुख झालेले पहावयास मिळाले. हे समुपदेशन आजच्या पालकांना किती गरजेचे आहे हे प्रत्येकाला भासत होते आणी डॉक्टरांना धन्यवाद देत होते.
पुन्हा एकदा डॉक्टरांचे आभार मानत आणि मनात एक विचार घेत सर्व आपापल्या घरी परतले.
---- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment