काय हा खेळ म्हणावा नियतीचा ? 

काय हा खेळ म्हणावा नियतीचा ? 

का निद्रेस त्यागुनी कुंभकर्ण स्वत: मरणासमीप आला ।

का त्यागुनी राजपाठ हरिश्चंद्र अपात्र पाणपोहीस झाला ।

का सम्राट मरुभूमीचा कैकेयीच्या तीन वचनांत अडकतो ।

का लडीवाळ लाडक्या पुरुषोत्तमास चक्क वनवासी धाडतो ।

का लढवय्या पार्थ टाकून धनु समरात कृष्णास प्रश्न करतो ।

का जाणूनी  फक्त सत्यअर्ध  महायुध्दात अभिमन्यु मरतो ।

का देवास ही घ्यावे लागे एक न दोन दहा दहा  अवतार

का झोळीत शेण अन पाण्यात गाथा, का झाले असले सत्कार

का स्वप्न अटकेपारचे कारणवश राजा काळ  फार नुरले

का लयास गेली मराठ्शाही ना रयतेस पाईक कोणी उरले

का उठाव ही मग वर्षांचा लढले  झांशी तात्या नाना

का नाही एकवटल्या तेथे त्वेषाने गर्विष्ठ त्या  माना 

का फितूर झाले गद्दार झाले अन जेरबंदी केला राजा

शह काटशह एकमेकातच का नाही वाटल्या कधी लाजा

का फुटले अन गनिमास मिळाले करूनी रक्तरंजित इतिहास

का केला घात नदीने अन आम्ही कायमचा गमावला विश्वास

का नाही लढले एकाच काजा सारे राजे मुलुख राजवाडे

दीड लाख भर साहेबांनी कोटी कोटींचे काढले वाभाडे

का नाही झाला आग्रह सत्याचा अन शुद्ध असहकाराचा

का नसता का टाळता आला दिवस जालियानवाला बागचा

का काळे पाणी नशिबात दिले अन देश राहिला गप्प कसा

का शब्द दोन अन नसता संपला भगत राजगुरू सुखदेव असा

का स्वतंत्र झालो कि भीक दिली तुकडे दोन टाकले पदरात

का चालून आला भाऊ कालचा फाटक्या वस्त्रांनी अंधारात

का नाही कळले मनोरथ चीनी फक्त म्हणतच बसलो भाई

का तो गिळून गेला मुलुख अन झाली होती युनोच आमची आई

का जिंकूनही ९१००० आम्ही जंग हारतो अन गमवतो स्वर्गसे सिर

का नसता का संपवता आला तिथेच प्रश्न कायमचा काश्मीर

                                           
                                            -  सचिन गाडेकर

--

Comments