थोडंस मनातलं 2......... ११/५/१६

थोडंस मनातलं 2......... ११/५/१६

पूर्वार्ध २

काही गोष्टी अलगद मनात घर करत जातात. त्या भावनेच्या मनोऱ्याला कसलाही औपचारिक अवडंबर नसते मुळीच. माणसाच मन मात्र अडकत जात. तेही खोलवर. या मनाला व्यावसायिक, व्यावहारिक जगाची ना फिकीर असते ना चिंता. डोळ्याने दिसणारे प्रकट लाभ, समोर नाचणारा भौतिक फायदा तर कधीच विस्मरणात गेलेला असतो. बरेच पंडित सल्ला ही देतात की कसं रहावं? कसं वागावं? वगैरे वगैरे....परंतु वर्षाकाठी मागे वळून पाहतांना क्या पाया ..क्या खोया चे गणित जुळले तरच खर. केवळ कामापुरते एकत्र येणे आणि दिलेला कार्यभाग संपवणे एवढाच काय तो मतलब असेल काय? अगदी एवढाच मतलब असावा काय?

कधी कधी वाटत की दूरदूर हून का आणि कशाला आम्हाला त्या विधात्याने एकत्र आणलं असेल? फक्त नोकरीची गरज, करियर, पैसा ई. तोकडी कारणे कुणालाही पटणारी नाहीत. (मला तर अजिबात नाही.) एका नोकरीच्या ठिकाणी चार तऱ्हाची माणसे कशी काय सामावली जातात? त्यांनी  एकत्र काम करणे हे लादलेले समीकरण मानायचे अथवा त्यांनी एक पाऊल पुढे येऊन ते स्वीकारावं. भले या साच्यात सगळे त्रिकोण, चौकोन, काटकोन बसणार नाहीत, मान्य आहे. परंतु आम्ही एकाच परिघाचे पाईक आहोत हे स्पष्ट असणे गरजेचे. व्यक्ती तितक्या वल्ली असणारच. त्या अनेकविध, अनेकप्रारूप, अनेकरंग असणारे सगळे धागे एकत्र करून त्यांची मोट बांधणे अपरिहार्य. ही मोट फार काही मागत नाही. जरासी हसी अन दुलार जरासा.....एका एका अभिरुपाला फक्त जोडत जायचं, जोडत जायचं. कुठे हल्के तर कुठे खुल्के.

या भरधाव, गतिमान प्रशालेत जीवाभावाचे चार मैतर व्हावे हाच अट्टहास मनी होता. मन आल्या दिवसापासून नुसत भिरभिर शोधत होत. कुणाला तरी  ते भाव पोहोचावे, कुणीतरी ते कनेक्शन ओळखावं हाच विचार मनात घोळत होता. कोई तो अपने जैसा मिलेगा ...वेळ सरू लागला. दिवस, मास, वर्ष पुढे सरकू लागले अन एकएक कडी जोडत गेली. या छोट्या विश्वात पुन्हा एकदा एक विशाल विश्व सामावलं. भेटले...तेच जे हवे होते. तेच ज्या साठी शोधगंगा अखंड वाहत होती. मन जणू भरून पावलं. आकाशातल्या त्या गरुडाला देखील घरटे आवश्यक असतेच ना.

झाल्या, उंच उंच झेपा सुरु झाल्या....मन त्या भराऱ्या मारू लागलं. सुसाट.....बेभान....अखंड......

या मित्रप्रवाहचा झरा असाच वाहत आहे अन राहील.

क्रमश: ...

                                                                     --- सचिन गाडेकर



Comments