अनमोल क्षण ... हार्दिक शुभेच्छा .... १४/५/१६

अनमोल क्षण ... हार्दिक शुभेच्छा .... १४/५/१६ 

आजच एक जवळच्या संबधात साखरपुडा पार पडला. अगदी रणरणत्या अन दाहक अश्या उन्हाळ्याला छेद देत हा कौटुंबिक सोहळा पार पडला. म्हणावं तर संबंध घरातलाच. मामा अन भाचे संबंध नव्या नात्यात परिवर्तीत झाला एवढंच.
आदल्या दिवशीची महिलांची लगबग, धावपळ, पळापळ अन खरेदीचा सुमार वेग पाहण्या जोगा होता. रात्री जेवण झाले अन मग फड रंगला गप्पांचा. वेगवेगळे विषय, वेगवेगळे अंदाज, काही त्याचा जुनाट चर्चा मस्त रंगल्या होत्या. मला तर प्रश्न पडला कि कोणता गट निवडावा? काही ठराविक मंडळी मस्त पान वगैरे खाण्यास जाऊ लागली. अगदी उत्सवाचे वातावरण.

नवरदेव साहेब मस्त ब्लीच करून आले. रंग उजळला असे भासत होतेही. झालेली खरेदी, साहित्य व्यवस्थित ठेवून महिला मंडळ मग्न झाले ते....मेहंदी मध्ये. जो तो हातावर मस्त मेहंदी लावून घेत होता. मज्जा म्हणे त्याच वेळेस तिकडे (वधूकडे) सुध्दा same कार्यक्रम चालू होते. (व्हाटसप ने केलेले उपकार की सगळे सोपस्कार online शेयर होत होते.) तरुण मंडळीने पाडलेला सेल्फी चा पाउस तर डोळे दिपवून गेला......

सकाळी आलेली जाग ती सुध्दा उशिराची, झालेली घाई, झालेले आंघोळीचे वेटिंग अजबच. सर्व तयारी अन कूच झाले. प्रवास तसा जवळचा पण तापलेले सुर्यनारायण खूपच प्रामाणिक पणे कर्तव्य पार पाडत होते. गरम झळाया अन गरम गरम मंडप... सरबत अन पाणी सारी गर्मी घेऊन गेलं काही क्षणभर....

नेहमीचा पायंडा अन त्या ठरलेलेल्या पद्धतीने कार्यक्रम सुरु झाला. भटजी कुठलाही शोर्टकट न मारता विधी संपन्न करत होते. आनंद वाटला अन दु:ख  ही झाले कारण पोटातले कावळे ओरडू लागले होते. मामा ने आवाज  दिला... फोडायची का सुपारी? अगदी सगळ टिपिकल...

विधी आटोपला अन सुरु झाले फोटोसेशन. बिचारे वर वधू त्या फोटोग्राफरच्या सूचना जणू ब्रम्हसत्य मानत ते वेगवेगळ्या पोझ देऊ लागले. ते लाजत हसणे, मित्रांचे डायलॉग, मैत्रिनीची उगाचच लुडबुड अन बरच काय काय चालू होते. हे सगळ पाहतांना जुने सगळे एपिसोड झरझर डोळ्यापुढून जाऊ लागले. वो लंम्हे ...वो बातें ...

या संसारच्या दुष्टचक्रात अडकलेला जीव मागे वळून पाहतो न म्हणतो की क्या मस्त दिन थे यार....चला....दोघांना शुभेच्छा देत सगळे पसार झाले. चोरून चोरून एकमेकांकडे पाहत नवरा नवरी बाय-बाय करत निघाले. छान झाला कार्यक्रम म्हणत पाहुणे, आप्त, नातेवाईक परतीस निघाले.

दोघांना हार्दिक शुभेच्छा ......
                                                                                

                                                                           ---सचिन गाडेकर 

Comments