शेगांव .....अनोखा अनुभव...
शेगांव .....अनोखा अनुभव... १८/५/१६
शेगाव खूप दिवसापासून शेगाव ला जाण्याचे मनात होते. कुटुंबीय अन मित्र परिवार जास्त उत्सुक होता. यामध्ये प्रश्न होता तो सर्वांना एकसाथ सुट्टी मिळणेच मोठे अवघड होते. मे महिन्याची गर्मी, चुकडे असलेला भयंकर उकाडा, आलेली उष्णतेची लाट हे सगळ विसरून मिळालेली सुट्टी (नोकरदारांना सुट्टी मिळणे काय असते हे ठावूक असेलच.) एका दिवसात सगळ काही ठरवून नक्की झाले. सुरवातीचा १३ चा आकडा नेहमीप्रमाणे १० वर आला. (अगोदर हो ..मी आहेच..वगैरे )
सर्वात प्रथम विचार झाला तो या उकाड्याचा. सोबत महिला न तीन चिल्ली पिल्ली. लहान बाळे म्हटली की अतिदक्षता घ्यावी लागते. लागणाऱ्या झळाया रात्री प्रवास केला तर टाळता येतील हा सुजाण विचार सर्वमान्य झाला न त्या प्रमाणे सर्व निर्णय झाले. उत्सुकता तर अशीही होती की काही मेंबर ९ ची वेळ दिलेली असूनही ६ लाच तयार होते. सर्व तहान लाडू, भूक लाडू घेतले आहेत का ही खातर जमा करून मार्गक्रमण सुरु झाले. तब्बल ३५० किमी चा प्रवास तसा मोठाच. आपण खूप दिवसांनी असे एकत्र बाहेर पडतोय हा आनंद प्रत्येकाचे चेहऱ्यावर दिसत होता. सुरु होण्या अगोदरच ‘अरे एक नको , दोन तीन दिवस चला’ अश्या काही गप्पा ऐकू आल्या. सेल मारला अन मामा निघाले गाडी घेऊन. सर्वांना ठरलेल्या प्रमाणे पिक-अप करत प्रवास सुरु झाला. सर्वांमधे असलेले सिंगर, डान्सर, नटखटपणा बाहेर येऊ लागला. व्यासायिक चौकटीत बरेचदा अंगभूत गुण तसेच खिचपत पडतात. अश्या ट्रीप त्या सर्व गोष्टी बाहेर घेऊन येतात. खूप झालेल्या रात्रीने सर्वावर निशामात्रा केली. सर्व मोबाईल चे दर्शन घेत झोपी गेले. एक पठ्ठ्या मात्र ड्रायवर मामांना सोबत देत त्यानी लावलेली कीर्तने,गवळणी, कधीही न ऐकलेली गाणी ऐकत (सहन करत?)जागा होता.
जसे औरंगाबाद कडे निघालो तर जाणवले की रस्ते खड्डेमय आहेत. इच्छा असूनही सारथी गाडीचा चमचा दाबू शकत नव्हता. सहज वाटून गेलं की सरकार बदलते, नेते बदलतात पण हे मुलभूत गरजांच ओझ काही संपत नाही. त्या भावनेवर निर्घृणपणे मीठ चोळले त्या टोल नाक्याने. कसला टोल घेतात देव जाणे. धड रस्ता नाही, कसला कुठे पोलीस नाही, कुठे महिलांकरिता सुलभ सुविधा नाही. तब्बल १०० किमी च्या प्रवासात (जागे होतो तोवर) एकही पेट्रोलिंग गाडी वा चेक नका दिसला नाही. मला नकारात्मक चित्र पुढे करायचं नाही पण हे सगळ टाळता ही येईना. कसं म्हणावं त्याला महामार्ग? गाडी आणी तिची आदळ आपट सहन करत चांगल्या रोड ची वाट पाहत झोप लागून गेली. विकास काय आहे? मराठवाडा का मागे पडलाय हा राजकीय प्रश्न मनाला शिवून गेला. बरीच बैचीनी झाली अन मग मधेच.....सैराट. आमच्या पठ्ठ्याने सैराट ची गाणी लावत सगळ मन परत ट्रीप मध्ये आणलं. (सारे प्रश्न अनुत्तरीतच आहेत तसे अजूनही)
अर्ध्या प्रवासात चहाचे झुरके किती महत्वाचे हे सांगायलाच नको. गुळमट,पांचट, जळलेले, करपलेले दुध न बरच काही होत एका कपात. परंतु चहाची तलफ ती तलफच. बाकी कशाचीही गरज नाही मग. त्यात एखादा आपल्या सारखा चहेडी... (गन्जेडी वगैरे असते ना अगदी तसेच...) भेटला तर मग विचारूच नका. चहा माहात्म्य सागंत नाही पण है तो है भाई....कोई तो विकनेस हो ... चहा , थोडेसे आळेपिळे, रस्तावर चर्चा अन पुन्हा सेल ....चला.....मार्गस्थ व्हा....बरच दूर जायचं आहे.
क्रमश: ...........
-- - सचिन गाडेकर
Comments
Post a Comment