शेतकरी अन भयाण वास्तव ...

शेतकरी अन भयाण वास्तव ...

लातूरच्या ट्रेनचे झालेले अकल्पित प्रत्यक्ष रूप आता सर्वत्र होणार की काय हा प्रश्न मनात घोंगावत होता गेली काही दिवस. पाटाला सुटलेले पिण्याचे पाणी, आसपास जमावबंदीचा आदेश, पोलीसगस्त, वीज पुरवठा बंद, फ्लायिंग स्क्वाड, पाटबंधारे अधिकारी अन त्या फिरत्या गाड्यांचे पथक ई. सगळे प्रकार का करावे लागताय हा प्रश्न उभा ठाकला. तिकडे जे होईल ते बघू पण हे पाणी घेऊच ही टोकाची भूमिका या भूमीपुत्राने का घ्यावी हे सुद्धा विचार करायला कुणाला वेळ नाही. उभी केलेली पिकं मागच जळून गेली. काही दुबार केली ती सुद्धा स्वाहा झाली. हाताशी चार जनावर अन त्यांची खपाटी गेलेली पोट काय सुचवत आहेत? मागे कधीतरी सप्टेंबर मध्ये म्हणे पाणी मिळाल होत या घरधन्याला.
बोलता बोलता अजून एक तरुण शेतकरी (दाढी अन केस वाढलेले, वेळ नाही अन कुठे जायचय म्हणे मला)मन मोकळ करत बोलू लागला. शेती आहे ६ एकर. आता गेल्या वर्षी तिथून तब्बल ५००० ते ६००० फूट सायफन झाले. त्यात बराच पैसा गेला. (कोणी त्या सायफनचे अन JCB चा दर ताशी चा दर तपासून पाहावा)दोन्ही पिके दगावली ती अवर्षणाने. थोडा फार आधार मिळाला तो या सायफनने. पाटाचे पाणी तिकडे नेऊन किमान गेली अनेक महिने थोडाफार भाजीपाला वा चारा अन त्या गाई जगवत आहे. हे सांगायला नकोच की तेवढेच काय ते उत्पन्न घरात येतय अन कुटुंब चालतय. (चार गाई, चारा, खाद्य, दुधाला मिळणारा भाव ई. चर्चा नाही केल्या तरच चांगल.)
तो पुढे म्हणाला की सायफनचा खर्च केला अन कळले की शेततळे पण महत्वाचं आहे. वाहून आणलेले पाणी कुठे साठवायचं? सरकार म्हणे की मागेल त्याला शेततळे देऊ... नुसत्या फुसक्या घोषणा. कागदावर असलेल्या योजना जर कधी प्रत्यक्षात आल्या तर नंदनवन होईल म्हणे, पण ते काय ...स्वप्नच. शेततळे २० गुंठे ते अर्धा एकर वर उभे करायचे. सहज विचारलं की खर्च काय येतो रे? ‘३ लाख ते चार लाख’ .. मला तर कळेना की काय म्हणावं ..या तळ्याच निर्माण म्हणजे क्षेत्र गुंतणार, पैसा शेतकऱ्याचा, पाणी कुठून आणणार हा यक्षप्रश्न. त्यात म्हणे दानशूर सरकार अनुदान पण देते पण ते कागदावर....भिक नको पण कुत्रा आवर अशी वेळ येते हो. त्यापेक्षा घर घालून सत्नारायण केलेलाच बरा. त्या तळ्याचे अस्तित्व सोसायटीच्या उपकाराने वा सावकाराच्या कर्जाने उभे राहते.
एवढ्या मोठ्या गुंतवणुकीस धजावणारा शेतकरी अजून किती कर्ज पेलणार? बर हे नाही करावं तर काय करावं त्यान? दरोडा? लूट? फसवणूक? चोरी? गळफास?या पैकी काय तारेल त्याला? तो तर फक्त आशा लावून आहे त्या निळ्या आभाळाकडे. थोडा दमटपणा आला की त्याला वाटू लागत की येईल आता. पडेल आता. पुन्हा सगळ हिरवगार होईल अन झालेलं सार कर्ज, सारा बोजा, सारी खरकटी उधारी चुकती करेन. पाणी अन निसर्ग जणू त्याशी जुनी दुश्मनी उस्तारतोय अस वाटत.
त्याला ऐकत ऐकत नभाकडे पाहिलं अन डोळे पाणावले. ऐक रे राजा याचं ....तुझ्या धरणीमातेचं रडगाण संपव. तो पाटाच्याकडचा जर या गर्तेत असेल तर पठार, अवर्षण मधील कल्पनाच नको. तसाच तो खर्च, ते तळे, सायफन, गायी सगळ अजूनही अनुत्तरीत.
                                                                --सचिन गाडेकर

Comments