यारो दोस्ती अन मित्र बित्र..

यारो दोस्ती अन मित्र बित्र... २३/५/१६
मोकळ्या वेळेत मनास अन त्याच्या मुक्त विहारास सर्वात जास्त गती मिळते. (एम्टी मायिंड वगैरे नकारात्मक प्रचार) विचार कोणते रुजवत ठेवायचे हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं असत. पेरलं तस उगवत म्हणतात ते ही काय उगाच नाही.  विचार मनात आले की दुरावा प्रत्येकाच्या आयुष्यात का डोकावतो? हे असे काही अंतर का असावे? असे दुरावे का असावे? ज्यांनी जीव ओतून तुम्हांस आपलेसे केलं, अनोळखी वाटा वाहिवाटा केल्या, झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याचा चक्क (आठवणीचा) सागर केला त्या सर्व सर्वांना इच्छा असूनही तडक भेटता न येण फारच वेदनादायी.
प्रत्येक फेज मध्ये मिळालेले सवंगडी त्या त्या कालखंडापुरते का मर्यादित राहावे? नव्या स्थानात नवे गडी जुडणे साहजिकच पण जुने डाव कसे मोडावे? जुने झालेले ऋणानुबंध कसे पडद्यामागे पडत जावे? त्या जुन्या वाटा अलगद धूसर का व्हाव्यात? पुस्तकाचे वाचन करत पाने उलटत जावे न एक पारायण झाले की ते शेल्फ मध्ये नेऊन टाकावे अन ते इतिहासजमा व्हावं. थोडंस काम पडलं की उचकून पहावं इतकं ते दूर जात... का पण?
झाले गेले विसरून जावे अन म्हणे पुढेपुढे चालावे हा या पिढीला मिळालेला अभिशाप म्हणावा की काय?सहजच केलेली समीक्षा की ५ वर्षापूर्वी जिवलग, दोस्त, फ्रेंड, बडी असे अनेक नामाभिधान धारण करत फुललेली मित्रबाग आज मात्र दुर्लक्षित नगरपालिकेचे मैदान बनलीय जणू. मोडलेले पाळणे, सुकलेले गवत, रंग उडालेले कारंजे, तुटलेल्या पाट्या, फक्त नावापुरते राहिलेले विजेचे खांब अन उरलीय ती फक्त चकचकीत, संगमरवरी उद्घाटनाची शोभनीय पाटी. त्यावरच्या तारखा अन व्यक्ती अन मैत्रीक बाता ही तशाच.
संवादाची साधने भरमसाठ पण कधीतरी बोलण ते ही मर्यादा आखून. भेटणे तर पूनम का चांद वो भी साल मे एक बाद. एक नक्की पटलय की ‘ दृष्टीआड तो सृष्टीआड ’ (सर्वात जास्त कडवट अनुभव हाच.) कसा कोण उलगडणार या कोड्याला. दूर गेलेला तो जवळ भासण वेगळ अन तो असण वेगळ. कधीकाळी तासन तास अभ्यास अन गप्पा मारणारे आज कुठला तरी बहाणा जो बोलायला, त्या जुन्या विश्वाला जिवंत करण्यात अपयशी ठरतात. कुछ तो रास्ता होगा अस म्हणणारे हळूच एक एक मार्ग बंद करत सगळ्या वाटा वन वे करून टाकतात. वन वे झाल की फक्त गोल गोल चक्कर मारणे नशिबी.
तशी ही तक्रार नाही वा आग्रह ही नाही. पण तर लागेल की हे आहे कटू सत्य, स्वींकारावे असे दाहक वास्तव, की मनाला समजावत मारून नेण्याचा चपखल सोपस्कार. अर्थात आठवणी अन त्यांचा उमाळा फक्त काम करतो अन थोडा दिलासा देतो. काही जुन्या मित्रांना, सवंगड्याना आठवून पहा, त्यांना आसपास शोधून पहा, ते अजूनही तितकेच जवळ, आपलेसे, दिल के पास, आसपास, एकदम खास आहेत नां.....सहज विचारलं.......

--- सचिन गाडेकर

Comments