ह्युमन रिसोर्स ....ते काय असते हो?

ह्युमन रिसोर्स ....ते काय असते हो? 2/6/16

व्यक्ती अन व्यक्तीची कुठल्याही विभागात लागणारी गरज सर्वश्रुत आहे. मोठमोठ्या इमारती उभ्या करून त्यात शिक्षण, व्यापार, सोहळे,लग्न कार्ये ई. गोष्टी पार पाडण सोप नाही. व्यक्ती नावाचा रिसोर्स जर तिथे कमी पडला वा कमी प्रभावी असला तर त्या सुंदर वास्तूला भुंगा लागणे, घरघर लागणे, उतरती कळा  लागणे अनिवार्यच. सर्वत्र झकास दिसणाऱ्या इमारती. अगदी सुसज्ज हॉस्पिटल असो वा सरकारी कार्यालय, खाजगी चकचकीत शिक्षण केंद्रे असो वा आय.टी. कंपन्या ... सर्वांची एकच अवस्था गणली जाते.
या विशालकाय व्यवस्थेत वावरणारे जीव मनुष्यच आहे. जर त्याला वजा करून एखादे गणित मांडले तर ती वास्तू खंडहर, हवेली अथवा स्मशान बनून जाईल हे ही अटळच. राजाचा दरबार देखील विना रत्नांचा, विना पंडितांचा, विना दरबारी कसा वाटेल हे अकल्पनीयच. सूत्रधार जर नांदी गाऊन सगळे अंक स्वतःच सादर करू लागला तर समोरच प्रेक्षक केंव्हा झोपी गेला अथवा पैसे परत मागू लागेल हे आपण कल्पना करू शकतो.
कठीण अवस्था, कठीण-अतिकठीण काळ किंवा आबदा सर्वावर येतेच. अशा काळात निर्णायक पारी खेळलेले हुकमी एक्के अन पठडीतले चौकोनी चिरे सर्वकाळ जरी त्या फॉर्म मध्ये नसतील परंतु ते त्या काळातले योगदान कसे कोणी भुलवावे, विसरावे ही न पटणारी अवस्तावता. ज्याचे जे कौशल्य ते तसे कसब प्रत्यक्षात पाहताना अजब आनंद होतो कसे सांगावे?
अकुशल बाबींचे समर्थन करणे चुकीचेच आहे.  किंबहुना टाटा समूहाचे ‘बिल्ड द रिसोर्स’ खूप प्रसिद्ध आहे म्हणे. त्या विपरीत रिलायन्स म्हणे ‘बाय द रिसोर्स’ चा उपासक आहे. आता यातील योग्य काय ते समीक्षकांनी ठरवावे. सगळे वृद्धिमान उद्योजक या पैकी जे सोपे अन सहज त्याचा अवलंब करतात. गरज असेल तर ...परीक्षेपुर्वीचा दगड देव बनतो अन परीक्षा संपली की तो फक्त matter म्हणून संबोधला जातो हे महाविडंबन नाही का?
भाकड झालेली गाय न मारणारे आम्ही आज मात्र रिसेशन आले की कर्मचारी घरी पाठवणे आद्यकर्तव्य मानतो. तो तांत्रिक अडचणीत येईल असे काहीतरी सहीप्रमाण घेतो आजकाल आम्ही. अर्थात हे असे सुचवत नाही की या मागे काही विचार नाही. व्यावसायिक व्याप अन निर्धावलेली अर्थपूर्णता या मागचे दिसणारे खरे सूत्रधार आहेत अस वाटून जाते. असो....आता या चक्रात आजचा अभिमन्यू इतका खोल अन आतपर्यंत गेलाय की फकत घात, मरण, प्रहार, रुदन, आक्रोश अन अगतिकता ...
शोधतोय तो कसा यातून बाहेर यावा की त्याला  अभिशापच आहे या चक्रव्युहात संपण्याचा?...                               
                                                 --सचिन गाडेकर 

Comments