पहिला पाऊस...

पहिला पाऊस..... ५/६/१६

गेल्या आठवड्यापासून मान्सून येणार अशा बातम्या येतच होत्या. केरळ ला आला आता ६ जून वगैरे ..दुपारी चिकार गरम झाले अन वाटू लागले की आज येणारच की काय.... सर्वत्र मित्र नातेवाईक फोन करून, मेसेज करून पहिला पाऊस झाल्याचे कळवत होते. तब्बल एका वर्षाने तो बरसला. होय... आठवत पण नाही गेल्या वर्षी पाऊस नावाचा प्रकार झाला होता की नाही.
संध्याकाळी बाहेर पडलो अन वातावरण तयार होते. बाहेर निघावं ते याचसाठी की त्या पर्जन्यदेवाने बरसावे अन ओलेचिंब करावे हे रान. तुफान वादळ वारा, चहूकडे धूळ, जोरजोरात घोंगावणारा वारा अन कडाडणाऱ्या विजा घेऊन तो आला. काही क्षणात आमच्या लाडक्या अन तत्पर अशा महावितरण कंपनीने वीजपुरवठा बंद करत पाऊस येणारच याची पावतीच दिली जणू. त्यातच दिसली ती लगबग दुकानं बंद करण्याची अन पटापट घरी जाण्याची.
काही क्षणात पाण्याचे थेंब अंगावर पडू लागले. अनेक महिन्याचे राहिलेले त्या धरतीचे अन पावसाचे मिलन किती सुमधुर, बेभान अन सुगम आहे हे त्या आलेल्या घमघम सुवासाने प्रतीत होत होते. श्वास दीर्घ करत ते मृद्गंध आत सामावत धन्यता मानत होतो मी. किती वाट पाह्लीय त्या धरतीने. किती दाह झालाय तिच्या अंतराचा. किती खोल खोल छिद्रे पाडून या मानवाने तिचे अंतरंग चाळण चाळण करून टाकलंय ते या मुळेच. दोन घोट पाण्यासाठी वणवण फिरणारी तिची चिमुकले पाहतांना तिचेही काळीज फाटले असेल. ती तरी किती देणार? गेली दोन वर्षे या आभाळाचे रुसणे धरतीच्या मुळावर उठलंय अगदी.
मी या थेंबाना पाहून वेडापिसा झालो. कसलाही विचार न करता थेट त्या आभाळमायेला भिडायला गेलो. त्या दोघांच्या मिलानाचा भाग बनायचं होत पहिला पाऊसात भिजण हे पूर्वीपासूनच गणित. एक एक थेंब अन त्याचा चित्त शांत करणारा गारवा ..अहाहा !! चिंब होऊन त्या पावसाला जणू सांगत होतो मी की आता कंजूषी करू नकोस. बरस तू,थैमान घाल, पाट वाहू दे, नद्या दुथड्या वाहू दे,धरणातून ओवरफ्लो व्हावा, सगळीकडे आबादानी करून टाक. तो शेतकरी राजा फक्त तुझ्या आशेवर उभा आहे अजून. यंदा तू चुकलास तर तो बळीराजा परत फिरकणार नाही त्या काळ्याआई कडे. तुही मग परका होशील त्याला. बघ...
भिजलो, भानावर आलो अन परत विचारमाला खंडित करून घरात आलो. तोवर वीज आली होती. टीवी चालू केला तर वादळी पावसाने झालेले नुकसान दाखवणारे न्यूजवाले किती विरोधाभासी अन बिनबुडाचे आहेत हे वाटून गेलं.ते त्याचं काम करताय अस समजावलं मनाला मी. परत खिडकीतून पडणारे टप-टप बिंदू येणाऱ्या सुखाचे अंदाज देत होते. हा ओघ असाच राहो. अत्र तत्र सर्वत्र पाणी पाणी व्हावे....
चला....सुरवात तर छान झाली. आता थांबायचं नाही गड्या थांबायचं नाही......  
                                                  --सचिन गाडेकर

Comments