नको अजून उशीर...

नको अजून उशीर.....११/६/१६

कालच भरून आलेलं आभाळ डोळ्यासमोरून पसार झालं. काळजाचं पाणी पाणी झालं. कारण माझा शेतकरी डोळ्यात तेल घालून वाट पाहत आहे. नांगरणी, मशागती कराव्या की नाही या गर्तेत तो आहे. पेपर वाचला तर फक्त बातम्या या अशा ... या वर्षी ११०% पाऊस होणार...६ जूनला मान्सून धडकणार ...अशा बातम्या अन वाढलेल्या अपेक्षांचं ओझं जरा जास्तच होऊ लागलंय. आज पटतंय की कितीही तंत्रज्ञान विकसित झाले तरी ते निसर्गापुढे नतमस्तकच आहे. आज काल तर प्रत्येक दिवस मोजावा लागतोय,काढावा लागतोय.

कालच विद्यार्थ्यांना दिलेला होमवर्क तपासतांना हे वास्तव अजून समोर आलं. सुट्ट्या कशा गेल्या याचे वर्णन करतांना निम्म्या पेक्षा अधिक मुलं सकाळी पाणी वाहिले, संध्याकाळी पाणी आणले असे सांगत होते. क्षणभर लाज वाटली की या प्रगत, विज्ञान काळात आमचे भविष्य अजूनही मुलभूत गरजांसाठी हवालदिल आहे. मामाच्या गावाला गेलो नाही कारण मामाकडे सुद्धा हाच प्रोब्लेम होता अस एकाने सांगितलं. खूप जास्त दाटून आलं होत की आमच्या पिढीच्या करंटेपणामुळे, निसर्गाच्या झालेल्या वाताहातीने बिचाऱ्या चिमुकल्यांच बालपण सुद्धा बाधित झालंय. काय मस्त (?) आठवणी मागे ठेवतोय आपण या पिढीला. बघा ना आता, मंगळावर झेप घेणारे आम्ही आज पाण्याचे उद्धव शोधतोय. एखाद्या भन्नाट विषयाचे वर्णन करायचं सोडून पाणी किती दिवसांनी येते, कशी धावपळ होते, कसे लोक भांडतात असे किस्से चर्चेला येतात. काय करणार ही पिढी दुसऱ्या कुणाच्या तरी पापाचे भोग भोगतीय....

बस्स ..आता संपावे हे चक्र. नभांनो आता कसर नकोय. सारा आसमंत ढवळून काढा. सिम्पली सगळच धुवून टाका. पुसून टाका या कटू दुष्काळी आठवणी. खूप दयाळू अन विसरभोळा आहे माझा शेतकरी राजा अन प्रजा...सगळ सगळ माफ तुला. तू फक्त ये....बस्स ये...

                                                  --सचिन गाडेकर

Comments