चिल्ली पिल्ली अन आगळीच दुनिया ..

चिल्ली पिल्ली अन आगळीच दुनिया ..

प्रवेशोत्सव अन अनुषंगाने होणारी धावपळ जणू आता अंगवळणी पडलीय. १५ जूनला सुरु होणारी शाळा म्हणजे नवे पर्वच. आदल्या दिवशीचे लास्ट मिनट पर्यंत झालेले काम अन लगबग नेहमीचीच तशी. बारीक बारीक गोष्टी देखील पार पाडतांना होणारी धावपळ तर पाचवीलाच पूजलेली. आदल्या दिवशी घरून निघतांनाच उशीर होईल हो असे बजावून आलेले सर्व शिक्षक हुशार अन अनुभवी (अनुभवातून शिकलेले) गणले पाहिजे.

तयारी अगदी घरातील लाडक्या मुलीच्या लग्नाइतक्या असतात. मुलगी सासरी जातेय यापेक्षा येणाऱ्या नव्या पाहुण्यांचे जास्त टेन्शन असते. कुठली कसर नको राहायला यात सर्वांच कसं पक्क लक्ष असते. अर्थात कुणी रुसेल याचा धाक नसून अतिथी देवो भव ही आपली संस्कृतीच आहे म्हणा. अहो, नव नव्या प्रकारे प्रशाला सजवून सर्व होस्ट तयार झाले त्या उद्याची वाट पाहत. झोपताना झालेला उशीर अन थकलेलं अंग उद्या लवकर उठायचं आहे हे मनाला ठासून बजावत होतं. पडल्या पडल्या झोप लागणं अपेक्षितच असते अशा वेळी.

सकाळ झाली अन ठरलेल्या वेळेपेक्षा लवकरच अलार्म वाजला. न विचारता सेट केलेला हा अलार्म काळजीतून लावलाय की बदला घेण्यासाठी (?)हे अजून समजलं नाहीय मला. पटापटा आवरून स्वारी निघाली ती अनेकविध विचारांनी. कसं होणार? काय होणार? सगळी चिल्ली पिल्ली वेळेत कशी येणार? कुणी जास्त उशीर करू नये ही चिंता,सुर्योदयापूर्वी कामाला लागलेले मामा – मावशी आठवले अन थोडा रिलीफ वाटला.

वेळ झाली अन पहिली बस येऊन थडकली. पहिला मोठा भोंगा अन आपण शाळेत आहे याची जाणीव तीव्र झाली. लहानगी बाळे लुटूलुटू चालत होती. त्याच्या कपड्यावर स्टेपल केलेला कलरकोड स्पष्ट दिसत होता.  कोण कुठल्या बस मध्ये आलाय याचे सोपे गणित अनेक वर्षापासून चालत आले आहे. मुले झरझर उतरली, आपापल्या वर्गाच्या दिशेने निघाली सुध्दा. अगदीच नवीन पाखरे मात्र गोंधळलेले चेहरे, कपाळावर मोठे प्रश्नचिन्ह घेऊन, कावरेबावरे होत चालत होते. त्यांना लागलीच हात पकडून योग्य तिथे पोहचवणारे सेवकवृंद ही कमालच.

सगळ पार पडलं आगमन झाले अन पुढचे सेग्मेंट सुरु झाले. त्यात एक पिल्लू मात्र खूप जास्त होमसिक वाटत होत. दोन तीन सेविका तिला खेळवत होत्या. सहज तिला उचलून घेतलं अन एक छोटसं गाणं म्हटल. विश्वास बसेना की ते पिल्लू क्षणात शांत कसे झाले? बहुदा घरी स्वरूपाला घेऊन झोपवण्याचा वा शांत करण्याचा अभ्यास कामी आला. ते बाळ शांत खांद्यावरच शांत झाले. लगेच त्याला वर्गात सोडलं अन मनात उमडला तो आनंद अपरिमित, अवर्णनीय, अतुलनीय.

एक विचार मनाला भिडून गेला की दिवसभर हा सगळा प्रयास करत शिकवणाऱ्या सर्व प्राथमिक शिक्षक अन शिक्षिकांना मात्र मनापासून सलाम. हे मातीचे गोळे स्वीकारून त्यांना एक एक रकान्यात घडवत जाणं खरच जिकीरीचे आहे. त्या कामातून मिळणारा पैसा कुठेच उभा राहू शकत नाही त्या कामापुढे. पैसा एक टोकन बनते या अतुलनीय कामाचे. त्या प्रशालेला त्यांचे दुसरे घर बनवत ते शिकवत राहतात. अजब...कमाल....बेहिसाब..

असो, दिवस सरला अन मोजमाप झाले तर प्रचंड व्याप, दगदग, धावपळ या मधे झालेले काही सुखद क्षण दिलासा देऊन गेले. लहानग्यांना भेटून झालेला आनंद शब्दापलीकडेच. मोठ्या सुट्टीनंतर आलेले ते चेहरे त्याच प्रेमाने भेटतात... डोळ्यात ते आलेले आनंदाश्रू तर लाजवाबच....या आगळया दुनियेत काम हे फक्त काम न राहता कधी ओढ, लळा, जिव्हाळा, जबाबदारी वगैरे बनते ते कळतही नाही.

संपूर्ण दिवस हा गजबजलेला होता पण या बऱ्याच गोष्टी आहेत त्या राहून गेल्यात ...है और भी जिंदगी |

                                                 --सचिन गाडेकर

Comments