काही अगतिक वळणे .

काही अगतिक वळणे ...... ७/६/१६

या धावत्या, वेगवान विश्वात यश-अपयश, गोड-कटू अनुभव, येतातच. बहुधा हे ज्याचं त्याचं नशीब असाव अस वाटत. नशीब नशीब म्हणत किती काळ वाट पाहणार? स्वतःच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवतानाच इतर काही बाबी फेरफार करतील, मदत करतील, पुढे येतील, अगदीच काही नाहीतर पडद्यामागून मोलाची भूमिका बजावतील अस वाटणे साहजिकच. पण त्यावरच सर्वस्वी अवलंबणे घोड्चुकच म्हणावी लागेल. काहीजणांना अशा गोष्टींचा आधार मर्यादित काळापर्यंत ठीक आहे. एका मर्यादेपलीकडे विसंबणे,अवलंबून राहणे ही व्यक्तीवर प्रश्नचिन्ह उभे करते ते उगाच नाही..

असाच एक चहाचा झुरका अन पसरलेले, विखुरलेले विचारस्तंभ उभे राहत होते. एका बाजूला एखाद्या बोथट हत्याराने एखाद्या सुकलेल्या वृक्षावर २४ तास घाव घालत, स्वतःची शक्ती वाया घालवत, नियतीला दोष देणे अथवा परिस्थितीच खराब आहे म्हणणे एक प्रकार दिसतो. तर दुसऱ्या बाजूला मी त्या हत्याराला धार देईन, झाडाची कमकुवत बाजू अभ्यासेन, किमान अर्धा वेळ त्या गोष्टीवर खर्च करत विश्वासाने, एक दमाने ते झाड जमीनदोस्त करणारा एक प्रकार.

चहाचे कप संपत संपत ती गोड चव सुद्धा थोडी फिकी पडली कारण ती दोन ध्रुव असणारी व्यक्तिमत्व समोर बसून त्याचा चोथा करत होते. किती सोपे दिसते हे वरकरणी. पण नुसता आवाज करणारी ढोलसमान वाद्ये सुद्धा आतून बेलाशक पोकळ असतात, रिती असतात, रिकामी असतात. चेहऱ्यावर दिसणारा कोन्फिडन्स अनेकदा फसवा ही असतो. आरडाओरडा, गोंगाट करणे सोप्या वाटा आहेत पण तितक्याच कमजोर आणि क्षणिक. मंथन व्हायला हवे की कोणत्याही प्रतिक्रियेचे भविष्यकाळात काय अनुरूप असेल? काय परिणाम असतील?काय आभास असतील?

बर अशी एक पब्लिक सायकोलॉजी आहे की एकाचा नकरात्मक सूर संपूर्ण गटाला, मित्रमंडळाला, विभागाला सुरुंग लावतो अन एक अशी काही लाट आणतो की सगळे त्यात वाहवत अन वाहत जातात. असावा...लोभ असावा, एम्पथी असावी,मैत्रीच्या आणाभाका असाव्या, साथ-संगत ही ठीकच पण मृगजळ पाहून सताड धावणाऱ्या मृगाला हाती काय लागते कधी विचार केलाय का? आपला जीवश्च कंठश्च थेट खोल सागरात उडी मारतोय तेही खोली माहित नसतांना.....त्याला सावरणं, धीर देण, वेळ पडली तर एक कर्णशीलात भनकावण काळाची गरजच.

गड्यांनो भानअसू द्या की ....
आज कठीण काळात उद्याचे आव्हान विसरून चालणार नाही.
आजची लढाई उद्याचा विजय निश्चित करून ठेवेन.
आजचे संघर्ष उद्याचे गौरवोद्गार लिहतील.
आजचा यत्न उद्याचा इतिहास बदलेन.

                                                                          --सचिन गाडेकर

Comments