प्रश्न करताय सारे ...विना उत्तराचे... २०/६/१६

प्रश्न करताय सारे ...विना उत्तराचे... २०/६/१६

जून महिना सुरु झालाय अन जो तो अगदी दिमाखानं कोट्या करतोय त्या मान्सून वर अन त्या लंगड्या, बेभरवशी  हवामान खात्यावर. जो तो प्रश्नचिन्ह उभे करतोय त्या वातावरणावर, वातावरणाच्या बदलावर. जो तो कवितांमधून, लेखातून, काहीतर थेट प्रश्न करू पाहतोय त्या विधात्यावर ...
प्रश्न करताय सारे की का येत नाहीय पाऊस?
का लांबलाय तो मान्सून?
कुठं अडकलाय तो केरळात की कोकणात?
का चुकताय अंदाज हवामान खात्याचे?
का उशीर अन किती हा उशीर?
अजून किती हाल पाहणार तो वगैरे ..

मग सहज विचारावसं वाटलं की कोण विचारतय हे?
कोण अस्वस्थ झालाय एवढा अन का बर?
प्रश्न विचारणारे, लंबे लंबे समीक्षण करणारे, whatsap वर पांचट जोक करणारे तरी काय करताय?
चला विचारुयात...
अहो...क्ष व्यक्ती साहेब...तुम्ही सांगा ना मला....
का अजूनही प्रत्येक गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण नाही झालं जे अनेक जणांनी करून दाखवलय?
का अजूनही गावातील जुने ओढे नाले तसेच गाळाने भरलेले आहेत?
का यंदा रिकामी झालेली बहुतांश धरणे अन त्यांतला गाळ काढला गेला नाही?
का अजूनही ती जुनी पडकी विहीर नादुरुस्त आहे?
का रिकामे आड मरणासन्न झालेत?
का अजूनही उद्या पडणारे पाणी अडवायला अन जिरवायला काहीच ठोस उपाय नाही?
का जो तो फक्त कुपनलिका घेत त्या राहिलेल्या साठ्याचे वाटोळे करतो आहे?
का घरचे सांडपाणी थेट गटारात जाऊन नदीला वा नाल्याला प्रदूषित करत आहे?
का अजूनही धनाढ्य उठ-सुठ गाड्या-घोड्या धूत आहे?
का त्या छोट्याश्या रस्त्यासाठी उभी वृक्षसंपदा जमिनदोस्त होत आहे अन कुणालाही त्याचं पडलेलं नाही?
का अजूनही जागा होत नाही माणूस?
का तो फक्त प्रश्न मांडत त्यातच धन्यता मानत आहे?
का नुसते उपकाराचे पाणी देणे आजकाल समाजकाम बनून गेलं आहे?
का? का? का?
असे अनेक का असतील आपल्या मनात...
सांगा नक्कीच अन अजून तो मान्सून बरसेल तर ठीक नाहीतर हे सगळे का नक्कीच आ वासून उभे आहेतच..
                                                        
                                                  --सचिन गाडेकर

Comments