खरेदी अन पुरुषवर्ग ....

खरेदी अन पुरुषवर्ग .... २१/६/

लग्नसराई असो अथवा आपत्कालीन आलेली खरेदी असो.. नेहमीचा अडकलेला, पिसलेला, त्रासलेला प्राणी म्हणजे पुरुष. अशा अनेक प्रकारच्या खरेदी प्रकारात पत्नी अन खरेदीत मग्न गर्दीत हरवलेला तो चेहरा किती सहन करतो याची प्रचीती नेहमीच येते.
एवढ्यात एक बस्ता बांधणेचा कार्यक्रम पार पडला. निवडक पाहुणे (निवडक हा शब्द उलट्या अर्थाने घ्यावा) अन सगेसोयरे पोहोचले. आदल्या दिवसापासून एक्सायटेड असणारे महिलामंडळ खूप उत्साही दिसत होते. अगदी या उलट निवांत, तकतक करत पुरुष मंडळी घड्याळ दाखवत चला, निघा, आवरा चा नारा देत होते. (अर्थात घरचे सर्व आवरून सावरून स्वत:चे आवरणे या दोहोत कशात जास्त वेळ गेला हे सांगायलाच नको.)
निघाले कसेबसे सगळे...मग झाला सुरु महायाग. एक महावस्त्रालाय ते दुसरे महादालन ते तिसरे झकास शोरूम...

सगळे एकामागून एक रिजेक्ट ...होय थेट रिजेक्ट. कसला विचार, कसली दयामाया वगैरे अजिबात नाही. एका साडीतील हे पैलू दुसऱ्या साडीत अन तिसऱ्या साडीतला कलाअविष्कार अजून चौथ्या साडीत. दुकानातील हेल्पर-कम-सेल्समन तर शांतीभूषण अथवा शांतीचा नोबेल द्यावा की काय असे अनेकदा वाटून गेले. साडी दाखवणे, नेसावने, स्वतः ट्राय करून दाखवणे, मोठा ढिगारा बाजूला सारत नवनवीन प्रकार पटवून देणे हे त्यांचे नित्याचेच कर्मकांड असेलही पण हे कसब खरच अजब.
दुपार टळून गेली होती बहुदा. चहा-कॉफी चा आधार काहीसा धीर देत होता. सहज रिव्हू घेतला तर कळाले की अजून नांदीच चालू आहे. एकही धाव स्कोरबोर्डावर नाही. अर्धा दिवस हळूच पसार झाला होता. काही काळ गाडीवर, काही काळ दुष्काळावर, काही काळ थेट मोदींवर, काही काळ पाण्यावर चर्चा बळच केल्या. विषय अगदी संपत आले होते. नंतर उखळ्या-पाखळ्या, कोपरखळ्या रंगल्या.

घड्याळ तीन वाजले सांगतानाच पोटातील कावळे अर्धमेले झाले होते. फक्त एक चक्कर मारला तर क्या बात है...सर्व महिलामंडळ त्याच जोशात अन बाकी प्रजा सुन्न...एकच प्रश्न ज्याचा त्याचा, ‘किती राहील हो?’ उत्तर नाही सांगितलं तरी चालेल. मग सहज बाहेर पडलो पाय मोकळे करावे म्हणून तर बाहेर त्या दालनाबाहेरचे चित्र कसे बोलके होते. बाहेरच्या बाकड्यांवर रांगेत वैतागलेले चेहरे सरळ माना खाली मोबईलमधे घुसडून बसले होते. सकाळी आलेले ते फ्रेश चेहरे पुरते कोमेजलेले अन मानसिक थकव्याने ग्रासलेले भासत होते. (अर्थात हा वैताग, राग कुठेही व्यक्त करता येत नाही हे ही लक्षात असू द्या.)

झालेले सर्व सायास प्रयास एका सहमतीवर येऊन शेवट गोड झाला. वाट पाहणाऱ्या नेत्रांना रिलीफ मिळाला. पटापटा गाडीत बसवत परत मार्गक्रमण करणारे ते हसरे चेहरे खरच पाहावेसे वाटत होते.
खूप सारं वेटिंग अन झालेला अल्प लाभ अन त्यातही समाधान हे वाखनाने महत्त्वाचे. असो...
अंत भला तो सब भला.....

                                     --सचिन गाडेकर

Comments