अविश्वसनीय....सगळं

अविश्वसनीय....सगळं अविश्वसनीय... १२/६/१६

संपूर्ण दिवस कसा निवांत गेला अन रविवार रविवारासारखा वाटला. मराठीत मोडशी असा एक शब्द आहे. ज्यांना माहित ते समजतील ही. मोडशी झाली अन दिवसाअंती एक काम आले म्हणून गावात चक्कर मारला. भर चौकाच्या बाजूला रिचार्ज करण्याचे नेहमीचे दुकान आहे. तिथे गाडी पार्क करताना नजर फिरवली तर प्रचंड गर्दी, गाड्या आडव्या तिडव्या लावलेल्या दिसल्या. आसपासची दुकाने सुद्धा बहरलेली होती. मोबाईल रिचार्ज करतांना नजर फिरवली तर लक्षात आले की ही झालेली झुंबड राशन दुकानासमोरील रांगे पेक्षा मोठी भासली. आधी वाटलं की पाण्याचा पुरवठा करणारा टेंकर आलाय की काय अस वाटलं. लागलीच दुकानदार काकांना मी विचारलं की एवढा ओघ कशाचा? ते हसून म्हणाले पलीकडे पहा सर... हे रोजचं आहे इथे. देशी अन विदेशी चा परवाना आहे म्हणे. 
सुन्न व्हायला झालं मला. रोज पेपरात, बातम्यात वाचतोय की दुष्काळ आहे, रोजगार नाही, हाताला काम नाहीय, गाठीला पैका नाही...किती विपरीत चित्र..म्हणजे पिणे चूक की बरोबर हा प्रश्न पडणे दूरच पण जिथे घरात राशन नाही, रोज काम मिळेलच असा काळ नाही असे दिवसमान असताना काय हा प्रकार? कसं असेल चित्र त्या घराचं? घरची पोर शाळा, कॉलेज ची फी भरता येत नाही म्हणून एकतर कुठेतरी काम बघताय अथवा ते शिक्षणच सोडून दिलंय त्यांनी. ती गृहिणी सुद्धा स्वत:च्या संसारासाठी उन्हात राबतेय किंवा दुसऱ्याचे धुणे भांडे करतीय ती. त्यात हा घरधनी, घराचा कर्ता असा लेझीम खेळत जाणार अन शिव्या शाप देणार.
थोडसं पाहिलं मी तर जाणवलं की त्या भाऊगर्दीत सारे मजूर वा दिवसभर कमवून खाणारेच होते. अंगावर ते मळलेले कपडे, तो थकव्याने भरलेला चेहरा, ती कामाने म्लान झालेली काया ओरडून सांगत होती की सगळे काबाडकष्ट करणारे होते, अरे ज्याने दिवसभर रक्त आटवले, स्वत:ला दिवसभर झिजवल काही दमड्यासाठी, काही नोटांसाठी तोच कसा काय असं करू शकतो? अरे या शरीराची होणारी माती तर बघ. प्रबोधन नाही पण किमान जाण तरी प्रसंग, काळ, वेळ, दिवसमान काय आहेत ....उद्याची मशागत, बियाणे, पेरणी, खत अन बरच काही करायचं आहे. रित्या हातानं कसा उभारणार तू विश्व? कसा दोन हात करणार त्या निसर्गाशी? कसा सुपीक करणार त्या काळ्या आईला?
घरी आलो अन बातमी चालू होती ती महाबीज बियाणं अन त्याच्या किमतीत झालेली १५% वाढ अन त्यावर चर्चा, वाद अन कष्टकर्यांच्या तिखट प्रतिक्रिया ...टीवी बंद केला अन डोळ्यासमोर चित्र उभे राहिले त्या गर्दीचे, त्या म्लान चेहऱ्यांचे ... सगळं काही अविश्वसनीय...सगळं अविश्वसनीय..
                        
                                --सचिन गाडेकर

Comments