लोक(घराणे)शाही?

लोक(घराणे)शाही? ४/६/१६

व्यक्तीअधिष्ठित परंपरा असणारा आपला देश, घराणेशाही तर पाचवीलाच पुजलेली, राजेशाहीचा  एकसुरात धिक्कार करणारे आपणच या अश्या लोकशाहीचे समर्थन, पालन करतोय. बैठक बसली तर विद्वान सुद्धा राजाचा मुलगाच राजा का? असा थेट सवाल करत रामायण ते महाभारत यावर निर्बुध्द भाष्य करतात अन येणाऱ्या निवडणुकीत मात्र साहेबाच्या पोरालाच मत देतात. साहेबांचे सगळे नातेवाईक जणू ते बाळकडू घेऊनच आलेत की काय असा भास होतो. अर्थात विषय तो नाहीच मुळी. समझने वाले को म्हणे इशारा ही काफी....
आम्ही ज्या आधारावर जुन्या पुराण्या गोष्टी बाद ठरवतो, त्यांना बदनाम करतो, बेछूट आरोप करतो, नव्हे नव्हे ते तर्कट करतो तेंव्हा मात्र ‘जरा गिरेबान में झांक लेना वगैरे..’ बोलावस वाटत. आता विचार केला तर कळेल की असे कोणते क्षेत्र आहे बुवा जे या पठडीत मोडत नाही? राजकारण तर या सिद्धांतावारच चालत म्हणा... उरलेला मोडकळीस आलेला सहकार सुद्धा याला अपवाद नाही. काही दिवसापूर्वी एक साखर कामगार भेटले अन बोलता बोलता म्हणाले की ‘सर, नाव तरी सहकारी होते आता ते पण मोठ्या भाऊंच्या नावाने ठेवलय’ (तसही नावात काय आहे म्हणा? असे शेक्सपियर सांगूनच गेले आहेत.) कुणीही सहज ओझरत जरी अवलोकन केलं तर कळेल की बडे बडे आश्रम, मंदिर-ट्रस्ट, शिक्षण संस्था, विविध पदे तर राखीवच असतात जणू. एखादा उत्तराधिकारी गुणवंत असेलही. मान्य आहे. या पद्धतीने किती अधिकारी व्यक्ती या पदावर बसतात अन ती पाळतात हे ज्याने त्याने ठरवावं.
बर.. आमची प्रजा अगदी तशीच. पद की व्यक्ती की गुणाभिलाषा ? चयन करावायचे अवघडच. खांद्यावर झेंडे घेणारे, जयघोष करणारे, उदो-उदो करणारे त्या कृत्रिम धुंदीतून कधी बाहेर येतील देव जाणे..दुर्धर झालेले हे आजार आता कोणत्या औषधीने निट होणार हे तो परमात्माच जाणो. अगदी सगळे नारायणमूर्ती व्हावे असे अजिबात नाही परंतु समाजवाद आहे म्हणत घरातूनच आठ प्रतिनिधी असणारे मुलायम तर नकोच नको. (त्या अमुक पार्टीचा उल्लेख या साठी की ती वेगळ्या राज्याची आहे नाहीतर ....तुमची पार्टी कोंची?
असोत....जे आहे ते आहे. चालू द्या. परवा वाचल्याप्रमाणे कलयुग आहे म्हणे एक महाराज अन हे असचं चालणार म्हणे. मागच्या काळात कुटुंबीय अन त्यांची ढवळाढवळ, चापलूसगिरी अन नको असलेला फेरफारच गळ्याचा फास बनला हे अ-शोक करत सांगायला नकोच. आता नाथाला अनाथ का व्हावे लागले हे सुद्धा स्पष्टच.(दोन्ही पण सिद्ध नाही ...म्हणून निर्दोष गणावेत.)
चला...बातम्या पण खूप भुंगा लावताय डोक्याला. आता वरुणराजे कधी दर्शन देतायेत हे पाहूया...

               -- सचिन गाडेकर

Comments