कार्ल मार्क्स (भाग १ )
कार्ल मार्क्स (भाग १ )
कार्ल मार्क्स या महान तत्वचिंतकाचा जन्मदिवस ५ मे रोजी आहे आणि या हस्तीला वैचारिक नमन करावयाचा आदेश अजिंक्य देवांनी दिला. त्यातला हा पहिला भाग.
साम्यवाद हा शब्द ऐकताच ज्याचं चरित्र समोर उभं राहतं तो म्हणजे कार्ल मार्क्स. त्या महान हस्तीला काय आणि कसे नमन करावे हे कोडेच पडले. मागच्या वर्षी एन्जेल्स आणि मार्क्स यांनी लिहिलेलं ‘COMMUNIST MANIFESTO’ हा ग्रंथ वाचत वाचत तोंडाला फेस आला आहे. अनेकदा ते वैतागून, थकून परत खात्यात ठेवून दिले आहे. त्याला वाचताना कधी कधी हेच कळत नव्हते की यांचा वर्ग कोणता म्हणावा? २०१८ सालात हे पुस्तक वाचताना विचार सतत घोंगावत होता की या यत्न कुणासाठी?
गरिबी आणि अमिरी यातला फरक जाणत हा भेदच नष्ट व्हावा हा विचार मानणारा आणि परखडपणे मांडणारा पहिला माणूस.
१. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या क्षमतेनुसार काम आणि जरुरतनुसार दाम – हा सिद्धांत तसा आजच्या स्वार्थी आणि अप्पलपोटी समाजात हे कसे मान्य होणार? मी जर जास्त बुध्दी किंवा ताकदीने काम केले आणि तिथेच दुसरी व्यक्ती कमी बुध्दी आणि कमी क्षमता असेल तर दोघांचे कामाचे मूल्यमापन एकसारखे कसे होणार? अर्थात हा आदर्शवादी विचार फोल ठरला असावा. जो जसे काम करेल तसे वेतन अथवा मोबदला कसा काय वेगळा असेल? असो,
२. जगातील सगळ्या मजुरांनी एकत्र या, तुमच्याकडे तसेही हरवण्यासारखे काहीच नाही. सुटली तर पायातली बेगडी नक्की सुटेल. – इथे मजदूर आणि त्या संबंधित वर्ग आजही तसाच आहे. प्रगती आहे ती फक्त संघटना आणि काही कायदे जे अस्तित्वात आले. किमान वेतन निश्चित झाले ते अश्या मुलभूत विचारांमुळे. येथे मार्क्स हे मान्य करतात की कामगार आणि मजूर वर्गाच्या पायात बेगडी आहेच. ही आर्थिक विषमतेची बेगडी आहे हे वेगळे सांगायला नको.
३. पूंजी एक मृत श्रम आहे. हे पिशाच्च समान असून केवल श्रमिक लोकांचे रक्त प्राशन करतो. हि पूंजी जशी वाढत जाईल तशी जास्त श्रमिकांचे रक्त पिपासू बनत जाईल. – पूंजी वाद आणि पूंजी यांना विरोध हा मुलभूत भाग आहे मार्क्सच्या चिंतनाचा. एकाच व्यक्तीकडे किंवा एका समूहाकडे जर ही संपत्ती संकलित झाली, जमा झाली तर तो फक्त आणि फक्त शोषणच करतो. त्याच्या अधीन असणाऱ्या श्रमिकांचे तो अधिकाधिक शोषण करतो. शोष्य आणि शोषित ही दरी वाढत जाते. दाता आणि याचक हाच संबंध फक्त निपजतो. पूंजीवादावर बेधडक हल्ले चढवत कार्ल मार्क्स साम्यवाद आणि विचारधारेची वीट रचतो.
(क्रमश:)
-- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment