श्रद्धांजली सुपरकॉप हिमांशू रॉय
श्रद्धांजली सुपरकॉप हिमांशू रॉय १३/५/१८
गेल्या आठवड्यात हळहळ व्यक्त करावी अशी बातमी कामावर पडली. न्यूजवर राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांनी आज डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचं वृत्त ऐकले. कर्तव्यनिष्ठ आणि जिगरबाज अधिकारी अशी ओळख असलेला अधिकारी एका दुर्धर आजाराने ग्रासतो आणि आयुष्याचा शेवट करतो हे न पटण्यासारखेच आहे.
वृतांकनात सगळा आलेख मांडला वाहिन्यांनी त्यात नमूद करावे ते आयपीएल स्पॉट फिक्सिंग, पत्रकार जे डे हत्या प्रकरण, लैला खान प्रकरण आणि सर्वात जोखमीची २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ला खटल्यातील दोषी अजमल कसाबच्या फाशीबाबत त्यांनी पाळलेली कमालीची गुप्तता हे सगळे काहीतरी वेगळेच सांगत होते त्या बंदुकीच्या गोळीच्या बातमीपेक्षा. असे कोणी कल्पना देखील करू शकत नाही.
असं म्हटलं गेलं की दुर्धर आजाराने ते खचून गेले होते. या नैराश्याच्या भरातच त्यांनी जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. इथे त्यांच्यासारख्या माणसाला काहीच दिवसापूर्वी ‘’फाईट शुरू है...जिंदगीसे लढ रहां हूं... देखते है क्या होता है’’ असे भावनिक उद्गार किती लढवय्या असेल हे दर्शवून जाते. या अश्या ‘सुपर कॉप’सोबत नियतीचा हा क्रूर खेळ किती चटका लावून जातो त्यांना फॉलो करणाऱ्या अनेक तरुणांना, पोलिसांना आणि व्यवस्थेला. एक एक असा कर्तव्यनिष्ठ आणि मुरलेला अधिकारी म्हणजे संपत्तीच. ती अशी क्रूर नियतीने ओरबाडत आणि खचवून लुटली हे पटत नव्हते दोन दिवस मनाला.
काही वेळ हिमांशू रॉय यांचा विचार मनात आला. शरीरयष्टी, मानसिक ताकत, कामाची जबरदस्त छाप, सुपरकॉप असे व्यक्तिमत्व जेव्हा एका खोलीत बंदिस्त होते ते देखील दुर्धर आजाराने तेव्हा काय अवस्था झाली असेल त्या मनाची... जिथे अपराधी, गुन्हेगार नाव ऐकताच कापतो तिथे एक बेड आणि एक खोली जीवन बनते तेव्हा मात्र मन खचले हे कसे ओळखावे? असं म्हणतात की ‘सिंह उपाशी मरेल पण कोणी मारलेले मांस खाणार नाही.’ यात दिमाखदार कॉप माणसाला एक आजार झुंजवतो आणि त्या निष्क्रीयतेला, असहायतेला किंवा इतरांनी दाखवलेल्या सहानुभूतीला हा वाघ सहन करू शकला नाही असे वाटते. ज्या बंदुकीने अनेक गुन्हेगार सुतासारखे ठीक केले किंवा थेट यमसदनी धाडले तीच बंदूक एवढा अन्याय करेल असे कल्पना ही करवत नाही.
मरण हे अटळच आहे पण हिमांशू रॉय सारखा लढवय्या जेंव्हा असे पाऊल उचलतो तेंव्हा माणसाला येणारे वैफल्य आणि त्याचे दूरगामी परिणाम यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे हे नक्की. डिप्रेशन काय करवू शकते याचे हे कटू उदाहरण. हिमांशू रॉय तुमच्या कामाचा ठसा तर तसाच राहील पण चटका लावून गेलं हे अश्या प्रकारे जाणं. असा कोणीही या डिप्रेशनचा शिकारी होऊ नये हीच मनोकामना.
--- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment