दाने दाने पर लिखा है ....२२/५/१८
दाने दाने पर लिखा है ....२२/५/१८
तर झालं असं की संध्याकाळची वेळ होती म्हणून जवळच्या मंदिरात हजेरी लावली आणि काही क्षण तिथेच घालवले. तिथे काही खूप वयस्कर तर काही तरुण मंडळी देखील होती. विधिवत पूजा अर्चा झाली आणि लागलीच हातात २ प्रकारचा प्रसाद देखील आला. छानशी मुठभर पुष्टी ती देखील मंदिरात मिळत असेल तर उत्तमच नाही का?
थोडा वेळ गर्दी चांगलीच वाढली होती. नेहमीपेक्षा एवढे भक्तगण एवढे जास्त कसे अशी विचारणा केली असता ‘अधिकाचा मास आहे’ असे समर्पक उत्तर मिळाले. थोडा निवांत होतो म्हणून निघण्याची घाई केली नाही. अधूनमधून कोणी न कोणी प्रसाद रुपात शेंगदाणे, खडी साखर तर कोणी काही. संध्याकाळची आरती करत मिळणारी प्रसादी पुष्टी वेगळीच हो. आरतीच्या आर्त स्वराने कोरडा झालेला घसा हळूवार ओला झाला होता आणि व्यतीत केलेली उर्जा साखरेच्या माऱ्याने केंव्हाच परत मिळवली देखील होती.
थोड्या वेळाने निरखून पहिले तर माणसाने माणसाला वाटलेला प्रसाद आणि त्याचे अनेकविध कण जमिनीवर सांडले होते. हे किंबहुना लक्षात देखील आले नसते परंतु पाचच मिनिटांत एक मोठी फौज घेत मुंग्या सवयीच्या ठिकाणी आक्रमण करत हि रसद गोळा करतांना दिसल्या. थोडे निरखून पाहिले तर हे असे नित्याचे असणार हे जाणवले देखील. तसेही स्वत:च्या वजनापेक्षा कैक पटीने ओझे वहन करत मुंग्या लगबग करत होत्या. आजूबाजूला त्यांचेच भावकीतले मुंगळे आपली भक्कम सेना घेत साखरेच्या मोठ्या दाण्यांना असे काही वाहून नेत होते जसे तो बाहुबली खांद्यावर पिंड घेत नाचत होता.
थोड्या काळाने एक कुटुंब आले आणि त्यांनी काही निवद (नैवेद्य) आणले होते. ते ९ ते १० निवद नमस्कार करीत पुढे मांडले आणि नतमस्तक होत ते बाहेर गेले देखील. त्यांचा मनोभाव पाहण्यासारखा होता. छोट्या छोट्या चाणक्या आणि त्यावर भजे आणि गोड जणू देवाला आळवीत असावे काही नवसापाई किंवा काहीतरी आनंददायी घडले असावे आणि त्याचा धन्यवाद असावा बहुतेक. याच दरम्यान आजूबाजूला कोणीच न्हवते म्हणून निर्व शांतता होती आणि ती मधेमधे कोणी आगंतुक दर्शनास आले तर घंटानाद होत ती शांतता एका नादात हरवून जात होती. दर काही वेळाने टण वाजणारी घंटा ध्यान मात्र नक्की भंग करत होती.
इतक्यात एका महिलेने लगबगीने येत सर्व देवापुढील निवद एका पिशवीत भरले आणि परत बाहेर जाऊन बसली. माझ्या लक्षात आले की त्या मध्यवयीन बाई ठराविक काळाने आत येत ठेवले जाणारे निवदसम खाद्यपदार्थ ती गोळा करत होती आणि डोळ्यात अजून कोणी येतंय का हे देखील पाहत होती. मी समोरील मुंग्या, मुंगळे यांच्यातून कधी त्या बाईकडे लक्ष केंद्रित झाले हे कळलेच नाही. मी फार धीर करत त्यांकडे गेलो आणि विचारले की आपण कुठे राहता वगैरे...एव्हाना त्यांना देखील हे कळले होते की मी त्यांना पाहिले होते निवद घेतांना. तसे निवद घेणे काही अपराध वा चोरी नाही. ते एक तर कुणाच्या घरी जात असावे किंवा कुणाच्या गोठ्यात. त्या बाई म्हटल्या की इथेच पलीकडे राहते आणि २ मुलं आहेत घरी. त्यांना रोजच्या चोखंडमधे हे मिळते आणि आमचे पोट भरते. कधीकधी खूप जास्त निवद येतात तर कधी फक्त खडीसाखर मिळते.
त्यांना केलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते पण अनेक प्रतिप्रश्न उभे राहिले मनात. कितीही काही झाले तरी ‘दाने दाने पर लिखा है खानेवाले का नाम’ हे सत्य आहे. कोणीच उपाशी राहु नये हि कसरत विधाता कशी करत असेल हे अनाकलनीय आहे. कुणाचा निवद हा कुणाचा प्रसाद तर कुणाचा भोग तर कुणाचा पोटाचा खड्डा असतोच.
(टीप: कोणीही मंदिर, प्रसाद, निवद यावर चुकीचे मत व्यक्त करू नये ही विनंती.)
--- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment