नांदा सौख्यभरे | १७/५/१८
नांदा सौख्यभरे | १७/५/१८
काल एक नवदाम्पत्य म्हणजेच आमचे मित्र, बंधू सतीश नगरकर भाऊ आणि वैशालीताई जैन यांच्या भेटीला जावे लागले कारण लग्नाला जाणे झाले नाही असे समजू. (या वाक्याचा अर्थ त्यांना विचारावा.) मागच्या आठवड्यात whatsapp display picture (डीपी) पाहिला आणि जरा गोंधळलो. तेवढ्यात अजिंक्यदेव यांनी फोन करत शहनिशा केली आणि मग खात्री झाली. पहिला शब्द होता , ‘वाह. छान झाले, धन्यो गृहस्थाश्रम|’ लगेच फोन करत अभिनंदन केले. थोडा राग होताच मनात पण प्रेमही तेवढंच आणि आनंदही तेवढा. फोन झाला आणि एकच झापाझापी. बराच वेळ सगळा झालेला कार्यक्रम ऐकत आनंद व्यक्त केला. लागलीच लवकरच भेट घेतो असे सांगत फोन ठेवला.
ठरल्याप्रमाणे भेट घेणे क्रमप्राप्त होते. काल अजिंक्यदेव आणि मी निघालो. थोडा वेळ झालाच नेहमीप्रमाणे. घरी पोहोचलो तर नवदाम्पत्य जणू वाटच पाहत होते. गळाभेट झाली नवरोबाची. घरात ज्येष्ठ व्यक्ती बसले होते. गप्पा टप्पा करत लग्नाच्या वार्ता ऐकल्या. सर्व लोकांच्या सांगण्यात मात्र एक धागा नक्की होता की अचानक झालं. घाईघाईत झालं, होऊन गेलं. मग हळूच नव्या वहिनीसाहेब कोकम सरबत घेऊन आल्या. कोकम हातात येण्यापूर्वी नाव घ्यावे हा आग्रह तर ठरलेलाच. मग आमच्या उच्चशिक्षित वहिनीसाहेबांनी मस्त मराठी आणि इंग्रजीचा मेळ साधत नाव घेतले. त्यात नवरोबाला कसे सोडायचे? त्यात तो शीघ्रकवी म्हटल्यावर जास्त अपेक्षा आणि त्याने देखील निराश केले नाही. एकमेकांना असे नाव घेत बोलणे किती रोमांटिक असते हे अनुभवले तरच कळेल. आमच्या भेटीत घर मात्र पूर्ण हास्यकल्लोळ करत होते. सगळे कामाच्या झालेल्या ओढाताणीतून मुक्त होत हसत होते आणि मोकळे होत होते. यात घरातील आजीबाई जे बोलल्या ते परतीच्या प्रवासात कानात घुमत होते, ‘बर झालास, एवढं हसवलंस, खूप बरं वाटलं.’ माणूस हसला ना की थेट काळजाचा ताबा घेतो हे पुन्हा सिद्ध झाले. आजीबाई हसल्या आई चैतन्यच पसरले.
तद्नंतर गप्पा ऐकत अनेक प्रश्नांची सरबत्ती केली आणि हे जाणून घेतले की सर्व कसे पार पडले? एवढ्यात नवरोबा आणि नवरीबाई एकमेकांकडे पाहत म्हणाले की ‘आम्हाला देखील असे वाटत होते की झाले लग्न? खरच किती लवकर आणि किती चटकन?’ त्यात हे देखील कळले की ११ तारखेला मुलीच्या बाबांचा मुलाच्या घरी फोन आणि उद्या या वर्षातील तारीख आहे तर काय हरकत आहे विवाहसाठी. बस्स, ग्रीन सिग्नल आणि धामधूम सुरु. सकाळी झालेला फोन एवढे चक्र फिरवेल असे वाटले नसेल.
विवाह म्हणजे केवढा डोलारा असतो आपल्याकडे. किमान पाच पन्नास आमंत्रित असावेत. तो तगमग सुरु झाली. लग्न म्हणजे किमान खरेदी असावी म्हणून इकडचे घोडे श्रीरामपूरमध्ये तर तिकडचे कोपरगावला पोहोचले. आवश्यक खरेदीने दुपार खाल्ली. मग लगबग भोजन, मेनू आणि आचारी यांची. पहिले मंडपवाला, दोन पंगतीसाठी लागणारा किराणा, सनईवाले, गुरुजी, कुटुंबीय, रीतीरिवाज, पार्लर आणि अश्या अनंत गोष्टी एका दिवसात गुंफणे दिव्यच म्हणावे लागेल. सकाळी झालेला कॉल रात्री दिड वाजेपर्यंत काम करवू शकतो आणि ते देखील असे. दुसऱ्या दिवशी सगळे शास्त्रोक्त पद्धतीने ठरल्याप्रमाणे पार पडले. अगदी छोटेखानी विवाह पार पडला आणि एक स्वप्न पूर्ण झाले असे दोघांच्या डोळ्यात तरळत होते.
मग, हळूच विचारले देखील की हा सगळा प्रवास कधीपासूनचा? किती वर्ष वाट पाहिलीत या सुवर्णक्षणासाठी. हळुवार उत्तर आले की किमान ४ वर्षे. वाह, सहज तोंडून उच्चार आले की ‘काल: पिबति तद्रसम | - काळ सगळ्या गोष्टीतून रस शोषून घेतो पण तुमच्या नात्याला ४ वर्षे तसेच प्रफुल्लीत ठेवले हा नात्याचा विजय आहे.’ मन असे प्रसन्न झाले होते की फक्त आणि फक्त आनंदच दरवळत होता या भेटीत. तसे म्हटले तर खरा प्रवास आता सुरु झालाय खरा. आता जपलेले मोती निखरायला हवेत आणि ईश्वराने ज्या कारणे आपणास एकत्र आणले ते साध्य करावयास आरंभ व्हावा.
खूप सारं लिहायचं होतं पण प्रत्यक्ष लग्न पाहणे नशिबी नसल्याने थोडा आवर घालतोय. (एकच फटका देतो.)तुम्हा दोघांना खूप उत्तुंग काम करतांना पाहायचे आहे. दोन महाशक्ती, दोन सुसंस्कृत जीव,दोन उच्च ध्येयवादी व्यक्तिमत्व एकत्र येतात ते काहीतरी विशेष प्रयोजन मानावे आपण.
दोघांना वैवाहिक आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
नांदा सौख्यभरे |
--- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment