अनपेक्षित आणि संतापजनक ४/५/१८

अनपेक्षित आणि संतापजनक ४/५/१८

एवढ्यात सोशल मिडीयावर काही मुलभूत बाबी पाहायला मिळत आहेत. मी स्वत: काही जणांना जवळून पाहतो ते एक प्रवाह त्याचा खूप विधायक उपयोग करतांना दिसतील. वैचारिक लेख, संशोधन, वाचन, कविता, लेख असे अनेक साहित्यिक कामे होताना दिसत आहेत. काही जणांच्या पोस्ट तर कधी येते अशी हुरहूर लागून जाते. अनेक चांगले लेखक, समीक्षक, ब्लॉगर लोक जुडले गेले आहेत. स्वत: वाचत असलेल्या पलीकडे खूप सारे आहे हे लोक सतत जाणीव करून देतात. काही संपादक मंडळी तर भन्नाट लिहितात. अ-राजकीय लिखाण असेल तर वाचन होणार म्हणजे होणार. किती तरी लोक अद्भुत  लिखाण आणी विवेचन करतात. हा मुक्त अभ्यासवर्ग फार कमी लोक attend करतात.

सोशल मिडिया एक तर खूप बदनाम आहे काही सुमार वापरकर्त्यामुळे. रोजची काही मिनिटे राखीव असतात ती काही ठराविक लोकांसाठी गरजेची असते. त्यात मधेच हे गबाळ घेतलेले लोक कोणत्याही थराला जाऊन पोस्ट करतात. यात फक्त राजकीय विष असते असे नाही. काही धर्म आंधळे धर्म रक्षक बनू पाहतात या मिडीयावर. जर क्रांती करावीशी वाटत असेल तर ती कृतीतून असावी; नाही का? उलटसुलट आणि फोटोशॉप केलेले माहितीलेख शेयर करत अभिमान बाळगतात. यात आणखी दुर्दैवी गोष्ट म्हणजे काही जणांना विचारले की हे असे विघातक आणि विरोधी लेखन अथवा पोस्ट का? तर त्याचे उत्तर होते की असे नाही केले तर आपले (हे ‘आपले’ कोण हे अजून अनुत्तरीत आहे बर का.) रक्षण कसे होणार?

एखाद्या राजकीय व्यक्ती अथवा पक्ष यांची भलामण करावी पण पातळी सोडून नाही. सुशिक्षीत आणि सुसंस्कृत दिसणारी माणसे सुध्दा वैयक्तिक पातळीवर घृणास्पद टीका करतात. अगदी हसू येण्याऐवजी किळस येते या प्रकाराची. आपण कशी काय कोणाची एवढी तळी उचलावी ज्यांचा माझ्याशी, माझ्या विचारधारेशी तसा संबंध नाही. मला राजकारण करायचे नाही, राजकीय जीवनांत जायचे नाही हे ठरवले असताना (समझने वालों को इशारा काफी है|) मी त्याबद्दल माझे मत जाहीर प्रकट करणे किंवा इतके टोकाला जाऊन समर्थन वा टीका करणे योग्य नाही असे स्पष्ट आहे. मला देखील आवड नावड आहे यात वावगे काही नाही परंतु बुध्दी गहाण टाकल्यासमान राजकीय पुढारी यांना आपले आदर्श मानत, त्यांना उचलून धरत, त्यांचे कढीपत्त्याचे पान होत स्वत:ला हिणवत आहोत हे कळण्याइतपत तरी भान असावे.

  एखादे मत व्यक्त केले जर ते थोडे सुध्दा सत्ताधारी किंवा विरोधी लोकांबद्दल भासत असेल तर त्यावर अभ्यासात्मक उत्तर देण्यापेक्षा तिथेच विष्टा करत अकलेचे तारे तोडतात काही. हा सगळा तसा वर्चुअल दुनियेचा परिणाम असावा. आपले मत मांडावे आणि ते खरेच आहे हा तांडा काय दर्शवतो? मोठे होतात ते राजकीय लोक, त्यांचे पुत्र, मित्र परिवार आणि डोक्यावर ओझे वाहणारा बैल तिथेच घाण्यावर. तरी देखील त्याला डीपी लावायचा आहे ‘मी अमुक तमुकचा समर्थक, मी खंदा समर्थक’ अशी वाक्ये असणारा. अरे, अस्तित्व तुझे ओळख, ओळख तुझा aura, कोण होतास तू, काय झालास आणि काय होणार? त्या लोकांमुळे कुणावरही बेछूट सुटतो का बरे? कोण आहे समोर आणि त्याच्या विचाराचे देखील स्वागत असावे हा आपला जुना घाट. अर्थात तो आम्ही केव्हाच डोहात बुडवून नवा अध्याय सुरु केलाय असे दिसतेय. हा असा आंधळा आणि गुलामी कारभार वीट आणि किळस आणतोय. काही जणांना पटेल आणि पटावे असा आग्रह नाहीच. असो,

--- सचिन गाडेकर

Comments