रेड चित्रपट आणि बिभीषण २९/५/१८

रेड चित्रपट आणि बिभीषण २९/५/१८

तसे बॉलीवूडचे चित्रपट फारसे प्रभावित करत नाहीत कारण तीच पठडीतली,अगदी बुरसटलेली लव स्टोरी आणि मसाला पाहत बसण्यात काय नाविन्य आहे असे वाटून जाते. त्यात घुसवलेली गाणी हवीच. संदर्भ मग स्वप्नात असो वा वास्तवात. परवा रेड ही आताच रिलीज झालेली मुव्ही थेट टीवी वर पहावयास मिळाली. आता हे देखील दुर्दैव की वितरकाने केवढा उतावीळपणा करत तो टीव्हीवर सोडला. त्याचे न भरलेले खिसे आणि झालेले नुकसान भरून काढले असावे असा अंदाज.

एक जुन्या घटीत घटनेवर थोडासा बॉलीवूड रंग देत चित्रपट बनवावा आणि प्रेक्षकांनी तो नाकारावा हे न पटण्यासारखे आहे. या चित्रपटाला ७.६ असे रेटिंग आहे IMDb चे. प्रश्न उभा राहिला तो या अशा धाटणीतले चित्रपट कोणाची आवड आहे मग? आजची १०० करोड क्लब म्हणजे एक तगडा हिरो, एखादी सडपातळ आणि ‘भूमिकेस न्याय देणारी’ (हे जास्त विस्तृत सांगायची गरज नाही.)नायिका , मस्त पैकी आयटम नंबर आणि एखादा गरजू व्हिलन. यात भरमार हवी गाण्यांची. सीन आणि सेट हवेत भरपूर. (भन्साळी म्हणे पहिले सेट लावतात आणि मग स्क्रिप्ट लिहितात.)

यात सर्व काही आलबेल आहे असेही नाही. चित्रपट एक मनोरंजनाचे माध्यम आहे हे गृहीत धरून चित्रपट पाहिले जातात हे ही खरेच. या  चित्रपटात काही संवाद आले आणि मी देखील अवाक झालो. त्यात ज्या घरी धाड पडते त्यात एक मोठे रग्गड कुटुंब आणि ज्याने त्याने भ्रष्ट मार्गाने कमावलेली माया घरातच दडवून ठेवली आहे आणि ती कोणालाच कानोकान खबर नाही असे भासवले आहे. एक तथाकथित राजकारणी म्हणा, गुंडा म्हणा किंवा अजून काही पण या राजाजीला त्याच्याच दिव्याखालचा अंधार दिसत नाही. घरात कोणी किती दडवले आहे हे प्रमुखालाच ज्ञात नाही हा कळसच. हाच राजाजी  अडचणीत सापडल्यावर असे काही दाखवले आहे की तो थेट मुख्यमंत्री आणि शेवटी तत्कालीन प्रधानमंत्रीकडे पोहोचतो.

आता तो संवाद पाहू. त्यात राजाजी आपल्या म्हाताऱ्या आईला काही बतावतो आणि ती उल्लेख करते रामायणाची. रावण तो पराक्रमी था. परमज्ञानी था, पारिवारिक था, उसको राम ने नहीं, उसके भाई बिभीषण ने मारा है | इथे मात्र डोक्यात सनक गेली. आता रावण पराक्रमी होता यात दुमत नाही. तो परमज्ञानी होता हे देखील ठीक. (चित्रपटात ती म्हातारी स्वत:च्या पुत्राला दिलासा देत आहे असे समजते. पण तो मात्र तिथे परमज्ञानी वगैर अजिबात नाही कारण ज्याच्या साम्राज्यात एवढी अनागोंदी आणि अफरातफर असून त्याला काडीमात्र माहित नाही तो कसला परमज्ञानी.)

पुढे म्हणतात की रावण पारिवारिक था | इथे देखील आक्षेप आहे कारण पैसा ज्या कुटुंबाला फक्त एकत्र राहायला भाग पाडतो ते देखील वरकरणी, जो तो फक्त स्वत:च्या तुंबड्या भरत एकमेकांना एकाच छताखाली फसवत आहे तिथे त्या लोकांना थेट रावण पारिवारिक था म्हणत उपाधी देणे पटले नाही. तसेही रावण कुंभकर्ण आणि बिभीषण यांचे काही सलोख्याचे आणि मधुर बंधूप्रेमाचे काही संवाद असतील तर अभ्यासू लोकांनी उद्धृत करावेच.

शेवटच्या ओळीत असे येते की उसको राम ने नहीं, उसके भाई बिभीषण ने मारा है आणि इथे देखील जबडा ऑ असा होता. मागे देखील व्हात्सापवर एक मेसेज फिरत होता जो रावणाचे समर्थन करत बिभीषण पासून सावध रहा असे सांगत होता. किमान बौध्दिक उंची नसलेली अशी पोस्ट सगळे फॉरवर्ड करतात आणि चुकीचा संदेश इकडेतिकडे होतो. असो, ‘घर का भेदी लंका ढाये’ किंवा हे वरती दिलेले असे वाक्य एकच म्हणावे. रेड पडली असताना जमलेली काळी माया सगळे उघडे पडल्यावर देखील कुठे काय आहे हे न सांगणे म्हणजे प्रामाणिकता किंवा सलोखा म्हणावा का? बिभीषण ज्यांना माहित नाही त्यांनी किमान अशी वल्गना करू नये. एक तर चुकीचे गोडवे गायचे असतील तर मग शेवटी देखील हिरोचा विजय नको, सत्याचा विजय नकोच.

बरं, असेच उदात्तीकरण करणे कितपत योग्य हा देखील प्रश्नच. मागे एकदा सिम्बिला असतांना ओसामा बिन लादेन याचा अमेरिकेने खात्मा केला तो दिवस. सकाळी आखातीदेश बहुल वर्गात गेलो आणि सगळे शांत आणि नाराज होते. मी सहजच विचारले असता त्यांनी ओसामा आमच्या देशात जन्मला आणि तो भला माणूस होता , त्याने केलेले सामाजिक काम ते वर्णन करून सांगू लागले आणि नकळत पटवुन देत होते की किती वाईट झाले. असेच प्रभाकरन, वीरपप्पन, याकूब मेनन यांच्या बाबतींत झालेले दिसते.
असो, प्रश्न मूळपदावर घेऊ तर हेच की रावण कितीही चांगला असेल तरी समर्थन नाहीच होऊ शकत. त्याला पारिवारिक म्हणणे देखील आक्षेपार्ह आहे. बिभीषण हा विषय कसा घ्यावा यात सत्याची बाजू कोणती हे महत्त्वाचे नाही का? रक्ताचा भाऊ आणि सत्य यातील निवड अवघड आहेच पण अशक्य नाही. सत्यमेव जयतेला कुटुंब, नाती गोती दाबतात आणि मग समर्थन होते असत्याचे. समर्थन होते चुकीच्या गोष्टीचे ओढून ताणून उदात्तीकरण करण्याचा पायंडा पडतो आहे.

असो, चित्रपट आहे, जास्त किरकिर नको. फक्त समर्थन होऊ शकत नाही काही गोष्टींचे.

--- सचिन गाडेकर

Comments