कार्ल मार्क्स (भाग २)
कार्ल मार्क्स (भाग २)
कार्ल मार्क्स या महान तत्वचिंतकाचा जन्मदिवस ५ मे रोजी आहे आणि या हस्तीला वैचारिक नमन करावयाचा आदेश अजिंक्य देवांनी दिला. त्यातला हा दुसरा भाग.
४. कार्ल मार्क्सचा सर्वात अस्वीकारार्ह वाटणारा सिध्दांत म्हणजे धर्म ही अफूची गोळी आहे. हे शब्द धर्माची रेलचेल असणाऱ्या भारत देशात तर कटू वाटतील. मार्क्स पुढे म्हणतात की मानवी मेंदू जे समजू शकत नाही किंवा सोडवू शकत नाही अश्या गोष्टींना चुचकारण्याचे काम धर्म करतो. आजच्या तारखेला हे समजणे सोपे आहे कारण धर्माच्या नावाखाली होणारे प्रकार फक्त जीवघेणेच नसून किळसवाणे आहेत. याला कोणताही तथाकथित धर्म अपवाद नाही बर का !
आजचे बुवा, बाबा , माता, बाबाजी, स्वामी, गुरुजी, अवतार, साक्षात प्रभू, ईश्वराचा अंश, कल्की अवतार इत्यादी इत्यादी पाहता आपण कुठे चाललो आहोत याची प्रचीती येतेच आहे. आता ह्या बातम्या रोजच्याच आहेत की याला शिक्षा झाली आणी त्याला दोषी ठरवले. प्रश्न हा फक्त एका धर्माचा नाहीच मुळी. इसीस सारखा भस्मासुर एका धर्मानेच जन्माला घातलाय. स्वर्गात जाण्यासाठी दिले जाणारे शिफारसपत्र आणि त्या विरोधात कोपर्निकस आणि बृनोचे गेलेले प्राण याचेच उदाहरण आहे. धर्म हा मूळ स्वरुपात सगळेच धर्म वंदनीय आणि अनुकरणीय आहेत. परंतु जे वास्तव आहे ते नाकारून अमुक ग्रंथात तमुक श्रेष्ठ विचार आहे हे थोथांड आहे. ‘बाप दाखव नाहीतर श्राध्द घाल’ या उक्तीनुसार धर्म अफुचीच गोळी आहे हे सह्प्रमाण सिध्द होते.
५. समाजाची प्रगती ही त्या समाजात महिलांना मिळालेल्या स्थानाने मोजली जावी.
कोणत्या काळात ऐकत आहोत आपण हे? १९ व्या शतकाच्या अगोदर जेमतेम १८४७ ते १८४८ दरम्यान मांडलेली ही विचारधारा. आजच्या फेमिनीस्ट लोकांनी पाय धुवायला हवे या अवलियाचे. समाजाचे मूल्यमापन करण्याचे मापनयंत्र दिलंय त्यानं. महिलांना मिळणारे समाजातील स्थान ही तेव्हाची देखील समस्या असेलच. आज जेव्हा कोणी म्हणतो की मार्क्सची गरज आहे ते तो इथे. त्याचा हा विचार कधी कोणी प्रकाशात का आणत नाहीत? रोजच्या पेपर मथळ्यात दिसणारे रक्ताचे डाग, महिलांच्या किंचाळ्या आणि या काळात का जन्माला आलो म्हणू वाहिलेली लाखोळी मन सुन्न करून जाते आणि आठवण करवते कार्ल मार्क्सची.
फक्त सामाजिक एकता नाही तर उत्तम समाजमूल्य दिसते यात. अर्थात जे सत्यात, प्रत्यक्षात येणे शक्य नाही त्या विचारला किती गोंजारणार?
असो.
--- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment