पहिला वहिला प्रयत्न आणि पुस्तक ११/५/१८
पहिला वहिला प्रयत्न आणि पुस्तक ११/५/१८
उद्या म्हणजेच १२ तारखेला एक विशेष दिवस असेल आयुष्याचा. प्राचार्य विजय केशवराव आव्हाडसर यांची जीवनगाथा पुस्तक रुपात साकार होत आहे. ‘शिक्षण क्षेत्रातील विजयस्तंभ’ असे नामकरण करण्यात आले आहे.
तसा लेखन हा प्रकार माझ्यासाठी फक्त कविता, ब्लॉग आणि लेख लिहिण्यापुरताच मर्यादित होता. त्यात व्यक्त होणे हाच एक भाव होता. मनात आलेले विचार प्रकट करत लिखाण सुरु झाले. त्यात आव्हाड सर आणि त्यांचे उत्तुंग व्यक्तिमत्व शब्दांकित करावे असे एका वर्षापासून वाटत होते. गेल्या जून मध्ये सर्वप्रथम सरांना विनंती केली की असे काहीतरी करण्याचा मानस आहे आणि आपण परवानगी द्यावी. सरांनी वेळ घेतला आणि त्यांचे मनापासून आभार की त्यांनी होकार दिला.
आता खरी प्रक्रिया सुरु झाली. ठरल्याप्रमाणे पहिली प्राथमिक यादी तयार झाली. सदर पुस्तकासाठी आधी काही गोष्टी ठरवण्यात आल्या. सरांनी त्यांच्यासोबत काम केलेले सहकारी, पालक, जिवलग मित्र, विद्यार्थी, कर्मचारी आणि कुटुंबीय यांची एक यादी बनवली. यात अनेक नवे नंतर जोडली देखील गेली. मी स्वत: या सर्वाना वैयक्तिक भेटत त्यांचे मनोगत जाणून घेत लेखन करावे असे ठरले. जे सर्व अभिव्यक्त होणार होते ते ज्या शब्दात आणि ज्या भाषेत व्यक्त होतील ते तसेच नमूद करावे हे महत्त्वाचे होते हा सरांचा आग्रह होता. हा आग्रह सर्व लेखात पहायला देखील मिळेल सर्वाना.
यादी तयार झाली. जवळजवळ ४० जणांची नावे आणि फोन नंबर घेत कामाला सुरुवात झाली. काही जण पुणे, काही नाशिक तर काही संगमनेर तर काही कोपरगाव आणि काही इतरत्र राहत असल्याने मुलाखतीसाठी आधी वेळ घेत काम करायचे ठरले. यात बरेच जण व्यस्त देखील असत. फोन करत appointment घेत एक एक शब्दमोती शब्दांकित होऊ लागला. जसजसी मुलाखत पूर्ण होत होती तसतशी ती असेल त्या भाषेत टाईप करून मेलवर सरांना पाठवली जाई. सर त्याची प्रिंट काढून घेत आणि बारकाईने तपासून त्यात सुधारणा असतील किंवा काही राहून गेले असेल तर लाल पेनाने नमूद करून ठेवत.
ऑगष्ट पासून सुरु झालेले हे काम हळूहळू गती पकडत दिवाळीत अर्धे पूर्ण झाले. पुण्यात पी.एच.डी. च्या कामासाठी गेल्यावर हे एक काम त्यात पूर्ण होत गेले. पुण्याला जातांना किंवा परततांना संगमनेरचे अभिप्राय पूर्ण केले. सरांनी प्राचार्य म्हणून तसेही संगमनेर येथेच जास्त काळ काम केल्याने तिथे तेवढा वेळ देणे गरजेचे होते. ती उर्जा आणि ते प्रेम संगमनेरकरांकडे प्रकर्षाने जाणवले. पालक, शिक्षक, विद्यार्थी, शाळेतील शिपाई हे सगळे कसे भारावून जात होते जुन्या आठवणी सांगतांना.
या सगळ्यात मिळाले ते पप्रकट अनुभव. प्रत्येक शब्द लिहितांना जाणवत होते की किती उत्तुंग कार्य केले आहे सरांनी. एखाद्या नवख्या गोलंदाजाला सचिन तेंडुलकरला पहिले षटक टाकण्याचे भाग्य लाभावे असे मला वाटत आहे. लेखक आणि संकलक म्हणून जबाबदारी होतीच पण दडपण जास्त होते ते सरांबद्दल लिहिणे याचे. त्यात कुटुंबातील दिपकदादा आणि दिपालीताई यांचा वाटा फार मोठा आहे. सतत संपर्क आणि धडपड कामाला बुस्ट देत राहिली.
नंतर सगळी जुळवाजुळव करणे, ठिकाण ठरवणे , सर्व आमंत्रित यादी, अल्पोपहार, सजावट, कार्यक्रम हे सगळे कुटुंबीयांनी एकत्र येऊन ठरवले. हे सगळे वेळखाऊ पण जास्त महत्त्वाचे होते.
मनुष्य म्हटला की चुका ओघाने आल्याच. या सगळ्या प्रक्रियेत काही राहू नये असे वाटत होते पण एक दोन महत्त्वाच्या व्यक्तींचे अभिप्राय चुकीने राहूनही गेले असतील. तारीख काही जणांच्या सोयीची नसेलही. ठिकाण फारसे मध्यवर्ती नसेलही परंतु सरांचे कुटुंबीय आणि आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलाय सरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा. हे असे उतुंग चरित्र ज्यांनी जवळून पाहिले, अनुभवले त्यांना पुन्हा त्या विश्वात घेऊन जाईल पंरतु जे तरूण मंडळी शिक्षणक्षेत्रात काम करत आहेत किंवा ज्यांना भविष्यात अश्या पोस्टवर काम करणे आवडेल अश्या सर्वांना एक दिशादर्शक आणि आदर्शवत मार्ग ठरावे हे पुस्तक.
तसा पहिलाच प्रयत्न लिखाणाचा आणि यातून खूप काही शिकायला मिळाले. खूप छान अनुभव आले. वेळेची मर्यादा आणि कामांचे नियोजन शिकायला मिळाले. लिखाण करणे एक छंद होता तो आता एक मूर्त स्वरूप घेत आहे हे पाहून विश्वास द्विगुणीत झालाय हे नक्की. परवाच वाचनात आलेले ‘अभी तो नापी है दो गज जमीन ...’ अधोरेखित करत पुढे क्रमण व्हावे हीच ईश्वरास प्रार्थना.
पुन्हा एकदा माझ्यातल्या अजून एका गुणास उभारी दिल्याबद्दल सरांचे मनापासून आभार.
-- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment