एक मस्त संध्याकाळ विथ कवी श्रीपाद २४/५/१८

एक मस्त संध्याकाळ विथ कवी श्रीपाद २४/५/१८

आज संध्याकाळी सहजच झुक्याबाबा (फेसबुक)चाळत होतो तर कुठे श्रीपादच्या अपडेटमध्ये तो राहाता येथे असल्याचे कळले. लगेच इनबॉक्स केला आणि पृच्छा केली कारण कविराज कधीच मोकळे नसतात. फोनवर गडी म्हणाला की थोडी घाई आहे, सोबत मामा आहेत, गाडी नाही वगैरे आणि त्याला येच म्हणालो. तो फक्त ‘फोनतो तुला’ एवढंच म्हणाला. मी समजून घेतलं की महाराज खरच व्यस्त असतील. मी थोडा वेळ वाट पाहिली आणि मग आपापल्या कामात गुंतवून घेतले. पाहतो तर काय चक्क फोन वाजला आणि श्रीपाद कुठे येऊ असे विचारत होता. लागलीच त्याला पिकअप केले आणि घरी आलो.

श्री, तशी आपली भेट तशी पुण्यात २००८ साली एम. ए. करायला आय.ए.एस.ई. मध्येच झाली. एकाच परिसरातले असल्याने ओळख वाढली. एक मस्त ग्रुप झाला होता. एकत्र अनेक धमाल गोष्टी केल्या असल्याने आठवणी कधीच कमी पडल्या नाही अजून तरी. पुढे तू फर्गुसनला शिफ्ट झाला आणि तुझे फकीरीतले ऐश्वर्य उजळणारे नवे अंग वृध्दिंगत झाले. आमचा हळवा श्रीपाद कधी लिहायला लागला कळलेच नाही. तू २०१० नंतर देखील अभ्यासात रमला. डी. वाय. ला नोकरी करत करत सेट पास केली. काय संघर्ष होता येड्या तो. लढलास आणि जिंकलास सुध्दा शेवटी. इथे तू खूप इन्स्पायर केले होतेस. 

आज तू परत भेटला आणि आपण  तब्बल वर्षांनी भेटत असू असे निवांत. तुझ्या  पहिल्या वहिल्या सुपरहिट पुस्तकाचे प्रकाशनवेळी भेटलो होतो. २००८ ते २०१७ हा प्रवास तुला  किती प्रगल्भ करून गेलाय हे कळत होते. आज तू बोलतांना जाणवत होते. काय होतं ना, आपण जवळच्या मित्रांना taken for granted घेतो आणि त्यांचे कौतुक राहत नाही, करत नाहीस कारण ‘अति परीचयादवज्ञा’ मी मात्र तुझा  आणि तुझ्या लिखाणाचा चाहता आहे पहिल्यापासून. अनेक चहाचे झुरके त्या कवितांनी लोटले आहेत घशात सांगवीत.

श्रीपाद आणि मी म्हटले की उजळणी होते पुण्यातील कॉलेज डेजची. त्यात आज सुध्दा आवर्जून आठवले ते चिंधडे सर आणि त्यांची शैली. सगळ्या प्राध्यापक मंडळीना आठवले आणि पुन्हा त्या विश्वात गेलो देखील. मधे मधे गमतीजमती आणि काही जुने फंडे देखील उल्लेखात आले ते नको सांगायला. काय आहे ना, तू आहेस अविवाहित आणि मी अपेक्षा करतो की तू लवकरच विवाहबध्द होशील.

श्रीपाद तू एक कवी म्हणून प्रचंड दाद मिळवत आहे आज. तुझे कष्ट आणि शब्दसमृद्धी थक्क करते. श्रीपाद, तू बोलता बोलता पुस्तक छपाई या मागील सोसलेल्या साऱ्या कळा बोलून दाखवल्या आणि मी फक्त ऐकत होतो. किती प्रगल्भ झालास श्री!! आपण  तसे फार कमी भेटतो पण जबरदस्त कनेक्शन आहे कायमचे. एक कवी मन किती पुढे घेऊन जाते हे ज्वलंत उदाहरण म्हणजे श्री. तुझी साहित्यिक ओळख अशीच वाढावी अशी त्याला शुभेच्छा कारण ते होणारच आहे. वेळेचा काटा कधीच पसार झाला होता. आम्ही खूप गप्पा मारल्या आणि मग रवाना झालो घराकडे. भेटत जा असाच, खूप सारं साचून जातं या मनात.
भेटू पुन्हा असेच!

-- सचिन गाडेकर

Comments