म्हटल मी ही मग ...... जमणार नाही.

म्हटल मी ही मग  ...... जमणार नाही.

उगवतीचा अरुण म्हणे सोबती मज रहा |
लवकर उठोनी कसा प्रसन्न सजग रहा |
म्हटल मी ही मग  ...... जमणार नाही

ओरडून सांगत ये सोबती चिवचिवणारे थवे |
उंच उडावे विसरून धरणी तुही आमच्यासवे |
म्हटल मी ही मग  ...... जमणार नाही

वेगवान गतिमान जीव म्हणे वेग असा धर |
अंतर विद्युतवेगे तू आता क्षणात पार कर |
म्हटल मी ही मग  ...... जमणार नाही

भेटलेही महाभाग असे म्हणे ठेव राखीव तुझे बोल |
कवाडे मनाची मुक्त फक्त  जातीनिहायच  खोल |
म्हटल मी ही मग  ...... जमणार नाही

होते कोणी आत्ममग्न म्हणे नेहमी हातचा एक सोड |
लागावे यावे तुजकडेच म्हणूनच ठेवावी एखादी खोड |
म्हटल मी ही मग  ...... जमणार नाही

कसला रे त्याग-बिग उगाच दरीयादील बनलास तू |
नकोस भेटू म्हणे असे धरून मने दिलखुलास तू  |
म्हटल मी ही मग  ...... जमणार नाही

करावा कसला यत्न म्हणे मिळतेच सुख आरामात |
केली पंची पोपटाची कि आपोआप होते रे करामात |
म्हटल मी ही मग  ...... जमणार नाही


भोग रे आनंद का सदा दमतो स्वल्प अल्प विरामात |
काढ वेड्यात थोडे काहींना ठेव आगळीच संभ्रमात |
म्हटल मी ही मग  ...... जमणार नाही

कर म्हणे पूजापाठ नवस फक्त होईल सारे सोपस्कार |
जोड हात,नमव शीर, विसर विद्रोह विरोध प्रतिकार |
म्हटल मी ही मग  ...... जमणार नाही

जग म्हणे बेबंद धुंद विसरून माया दया उपकार |
लाठीवाल्याचाच इथे कसा मस्त चालतो अधिकार |
म्हटल मी ही मग  ...... जमणार नाही

घे रे दे रे कामासाठी किती वेळा  नाही तू म्हणणार |
पैसा आहे धर्म ज्याचा तोच इथे बघ राज करणार |
म्हटल मी ही मग  ...... जमणार नाही

थांब म्हणे लेखणी आता थोडा घेऊन बघ विश्राम  |
दे आराम तनामनास आता कर पुरे आजचे  काम |
म्हटल मी ही मग  ...... जमणार नाही

-सचिन गाडेकर

Comments